राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू नाही – राजेश टोपे

राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू नाही – राजेश टोपे

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचं केंद्र सरकारने संसदेत लेखी उत्तरात सांगितलं. त्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी महाराष्ट्र सरकारने राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असं प्रतिज्ञापत्र मुंबई हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाला सादर केल्याचा दाखला दिला. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भूमिका मांडली आहे.

“महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मात्र देशातील अन्य राज्यात मृत्यू झाले असतील, त्या बद्दल मी भाष्य करणार नाही. तसंच अधिवेशनात सभागृहात बसलेले काही जण म्हणालेत की, ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले आहेत. पण त्यांनी राज्याचं नाव घेतलेले नाही. महाराष्ट्रात असे मृत्यू झालेले नाहीत,” असं राजेश टोपे म्हणाले.

राष्ट्रीय शीत साखळी संसाधन केंद्राचे उद्घाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. विधानपरीषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रदीप कुमार व्यास, आरोग्य सेवा विभागाच्या संचालिका अर्चना पाटील, आमदार चेतन तुपे उपस्थित होते. त्या कार्यक्रमानंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पूरग्रस्त भागात लसीकरण वाढवणार

राज्याला चार पाच दिवसांत दहा लाख कोरोना प्रतिबंध लस मिळते. ती रोज मिळायला हवी. सध्या दोन तीन लाख मिळत आहेत, आम्ही केंद्राकडे जास्तीत जास्त लस मागणी करणार आहोत. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांना घेऊन भेटायला जाणार आहोत, असं राजेश टोपे म्हणाले. जिथे जिथे पूरस्थिती असेल, तिकडे आरोग्य व्यवस्था सुरू केल्या आहेत. या भागात लसीकरण करा असं सांगितलं आहे, आरोग्य युनिट तयार करण्यात आल्या आहेत, सर्व जण मदत करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

 

First Published on: July 23, 2021 5:12 PM
Exit mobile version