राज्यातील आरोग्य सेवा कोलमडणार, एमसीआयने घातला परिक्षांचा घाट!

राज्यातील आरोग्य सेवा कोलमडणार, एमसीआयने घातला परिक्षांचा घाट!

राज्यामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात पदव्युत्तर विद्यार्थी व्यस्त असताना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) परिक्षेचा घाट घातला आहे. एमसीआयने ३० जूनपर्यंत परीक्षा घेण्याचे आदेश देशातील सर्व राज्यातील विद्यापीठांना दिले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, अशा परिस्थितीत परीक्षा घेतल्यास त्याचा मोठा फटका राज्यातील आरोग्य सेवेला बसून संपूर्ण आरोग्य कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमसीआयकडून महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली यासारख्या राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत बेफिकीर असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

देशामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत असून, देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत हा आकडा ३५ टक्क्यांपर्यंत आहे. राज्यामध्ये २७८४ विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमामला असून मुंबईमध्ये ९४० विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी दिवसरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. असे असतानाही कोरोनाविरोधातील लढ्यात पहिल्या दिवसांपासून अथक मेहनत घेत असलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा ३० जूनपूर्वी घेण्याचे आदेश एमसीआयने दिले आहेत. यामध्ये परीक्षा कशी घेण्यात यावी यांच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्चमध्ये होणाऱ्या उन्हाळी परीक्षा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पुढे ढकलल्या होत्या. सध्या मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे डॉक्टरांची संख्या अपुरी पडत आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबाबत पुढील दोन महिने कोणतेच भाकीत करणे शक्य नसताना विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्यास आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. एमसीआयने ३० जूनपर्यंत घेतलेल्या परीक्षेच्या निर्णयामुळे कोरोना रुग्णांच्या सेवेत व्यस्त असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. सर्वसाधारणपणे दरवर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षेपूर्वी अभ्यासासाठी एक महिन्याची सुट्टी घेतात. त्यामुळे ३० जूनपर्यंत परीक्षा झाल्यास कोरोनाच्या लढ्यात सर्वाधिक महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे २७८४ विद्यार्थी परीक्षेसाठी किमान एक महिन्याच्या सुट्टीवर जाण्याची शक्यता आहे. हे विद्यार्थी सुट्टीवर गेल्यास राज्याचा आरोग्य सेवेचा डोलारा कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमसीआय राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत बेफिकीर असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिकट होत असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्यातील विद्यापीठाने जुलैमध्ये परीक्षा घेण्याची तयारी सुरु केली आहे. ज्यांचा प्रत्यक्ष कोरोनाच्या लढ्याशी संबंध आहे अशा पदवीत्तर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा अट्टाहास का अशी प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त करण्यात येत आहे.

आम्हाला एमसीआयचे परिपत्रक प्राप्त झाले आहे. परीक्षेच्या आयोजनाबाबत आम्ही विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे मत विचारात घेत आहोत. तसेच राज्य सरकारच्या सरकारचे मार्गदर्शन वेळोवेळी घेत असून त्यांच्या मार्गदर्शनानुसारच परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येईल.

– डॉ. अजित पाठक,  परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा घेण्याच्या सूचना आम्ही यापूर्वीच मार्डमार्फत विद्यापीठाला दिल्या आहेत. त्यानुसार परीक्षा घेण्यात येतील याबाबत आम्हाला विश्वास आहे. एमसीआयकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार होणे अपेक्षित होते. तसेच त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या राज्यात परीक्षेनंदर्भातील निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठाकडे सोपवली पाहिजे.

– डॉ. दीपक मुंडे, अध्यक्ष, केईएम मार्ड (पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थी)

First Published on: May 24, 2020 3:05 PM
Exit mobile version