पुढील पंधरा दिवस सूर्य आग ओकणार; तापमान वाढीचा अंदाज

पुढील पंधरा दिवस सूर्य आग ओकणार; तापमान वाढीचा अंदाज

मुंबईः अवकाळी पाऊस, रात्री हवेत असणारा गारवा, दुपारचे ऊन, या वातावरणात बदल होऊन पुढील पंघरा दिवस तीव्र उष्णतेचे असतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आजपासून राज्यात कोरडे हवामान असेल. कमाल तापमान २ ते ४ अंशांनी वाढ होईल. त्यामुळे ऊन्हाचे चटके अधिक जाणवू लागतील, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

गेल्या दोन दिवसांत पारा ३८ अंशांवर गेला आहे. पुढील काही दिवसांत यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य, उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. ओडिशापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे वातावरणात बदल होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

गेल्या महिन्यात महाराष्ट्रात पडलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. मध्येच पाऊस, थंडी तर कधी ऊन्ह्याचे चटके असे वातावरण होते. अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. मुबई, ठाण्यातही अवकाळी पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. गुढीवपाडव्याच्या आदल्या दिवशी पाऊस पडल्याने सणावर विरजण येण्याची शक्यता होती. मात्र गुढी पाडव्याला पावसाने विश्रांती घेतली.

मार्च महिन्यात ठाण्यात ०९.८६ मिमी पाऊस बरसल्याची नोंद झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी शेतकरी वर्गाचे मात्र नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात पडलेल्या पावसामुळे पावसाळा सुरू झाला की काय अशी चर्चा रंगताना दिसून आली. पहिल्या एक तासात ०६.१० मिमी तर त्यानंतरच्या प्रति तासाला प्रत्येकी ०१.०० मिमी पाऊस पडला होता. पाऊस सुरू झाल्याने शाळकरी मुलांसह पालकांची चांगली धावपळ झाली.

मुंबईतही अवकाळी पावसाने रात्री हजेरी लावली. रात्री अचानक पाऊस पडल्याने चाकरमन्यांना भिजतच घरी जावे लागले. काही भागात लहान मुलांना व नागरिकांना या अवकाळी पावसात भिजण्याचा मोह आवरता आला नाही. शिवाजी पार्क येथे पडलेल्या पावसाने वाहतूक धिमी झाली होती. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती.

मार्च महिन्यात अवकाळी पावसाने त्रास दिला असला तरी एप्रिल महिन्यात मात्र ऊन्हाचे चटके अधिक जाणवतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

First Published on: April 2, 2023 9:56 AM
Exit mobile version