कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पुढील ३ दिवस मुसळधार

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पुढील ३ दिवस मुसळधार

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने शनिवारी वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली. राज्यात कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसेल, असा इशारा देण्यात आला आहे. ऑगस्टच्या पंधरवड्यापर्यंत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण कोकणात काही भागात मुसळधार पाऊस झाला. सध्या राज्यात हलका पाऊस होत असला तरी पुढील ३ दिवसांत काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाले आहे. ते उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर ते धडकणार आहे. परिणामी या दोन्ही राज्यांसह तेलंगणा, छत्तीसगड, सिक्कीम, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार आहे. या राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

First Published on: August 21, 2022 5:40 AM
Exit mobile version