मदत पूरग्रस्तांना

मदत पूरग्रस्तांना

रिलायन्सकडून पूरग्रस्तांसाठी पाच कोटी
कोल्हापूर आणि सांगलमधील पुराचे पाणी ओसरले असून मदतीसाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत. पुरात अनेक लोक सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. दरम्यान रिलायन्सनेही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला असून पाच कोटींची आर्थिक मदत दिली. रिलायन्सकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता पाच कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सोपवला.

टिटवाळा येथील पूरग्रस्तांना दिले जीवनावश्यक साहित्य
84 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला, त्यात ठाणे जिल्ह्याची वित्त व जीवितहानी झाली. ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा या शहराजवळून भातसा धरणातून येणारी काळू नदी वाहत असल्याने या नदीला सुद्धा त्या दिवशी महापूर आला होता व नदीपात्राचे पाणी संपूर्ण शहरभर पसरले होते. तसेच नदीला महापूर आल्याने नदीपात्राच्या काही अंतरावर असलेले टिटवाळा येथील वारघडे नगर या ठिकाणाला या महापुराचा सर्वात मोठा फटका बसला होता. वारघडे नगर ठिकाणावरील अनेक घरे पाण्याखाली बुडून गेली होती व पुराचे पाणी घरात घुसल्याने अनेकांचे धान्य, कपडे व मुलांचे शैक्षणिक साहित्य पाण्यासोबत वाहून गेले होते. दुर्गसंवर्धन प्रतिष्ठान, ठाणे यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू व शैक्षणिक साहित्य टिटवाळा येथील पूरग्रस्तांना प्रतिष्ठानकडून वाटप करण्यात आले. यात तांदूळ, डाळ, गव्हाचे पीठ, साखर, चहा, तेल, मसाला, हळद, कोलगेट, साबण व महिलांना साडी, बेडशीट, शैक्षणिक साहित्य अशा स्वरूपात ही मदत आहे

राज्यमंत्री अविनाश महातेकरांची पूरग्रस्तांना १ लाखाची मदत
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी वैयक्तिक उत्पन्नातून राज्यातील पूरग्रस्तांना एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. महातेकर यांनी त्यांना मंत्री म्हणून मिळणार्‍या सरकारी मानधनातून लाख रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी, 19 ऑगस्ट रोजी सुपूर्द केला.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, रिपाइंचे महासचिव काकासाहेब खांबालकर, मुंबई प्रमुख गौतम सोनवणे, पप्पू कागदे आदी उपस्थित होते. सरकार म्हणून सामाजिक न्याय विभाग पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत समाजाच्या सर्व स्तरातून मदत येत आहे. आपणही समाजाचा एक भाग आहोत, त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून आपण आपल्या वैयक्तिक उत्पन्नातून ही मदत करत असल्याचे यावेळी राज्यमंत्री अविनाश महातेकर म्हणाले.

रायगडमधून पूरग्रस्तांना मदतीचा हात
रायगड जिल्ह्यातील पेण, नागोठणे, खालापूर या गावांतील नागरिकांनी त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार वस्तू, पैसे जमवून ते सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांना दिले. अशा प्रकारे रायगड जिल्ह्यातून पूरग्रस्तांच्या मदतीला अनेक हात पुढे आल्याचे दिसून आले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पेणमध्ये विविध सामाजिक संघटनांतर्फे जीवनावश्यक वस्तू घेऊन अनेक कार्यकर्ते तिकडे रवाना झाले. रायगड जिल्ह्यातही महाड, पेण, रोहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांनी आपले दुःख बाजूला ठेवून मदतीसाठी पुढाकार घेतला. पेणमधील रामेश्वर ग्रुप या उद्योजक कंपनीचे संचालक राजू पिचिका यांच्याकडून शिरोळ (कोल्हापूर) येथील पूरग्रस्तांसाठी साडेतीनशे कुटुंबांना आठ दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या.

नागोठणे येथून कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून गोळा करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंसह भांडी, कपडे व अन्य सामुग्रीचा टेम्पो रवाना करण्यात आला. मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी मदतीची संकल्पना मांडल्यानंतर नागरिकांनी त्यास उत्स्फूर्त पाठिंबा देऊन पोलसानी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून मदत गोळा केली.

तर महापूर ओसरल्यानंतर पुनर्वसनासह स्वच्छता हा विषयही महत्त्वाचा असतो. म्हणून खालापूर तालुक्यातून मदतीच्या बरोबरीने स्वच्छतेसाठी देखील हात सरसावले आहेत. तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवी संस्थेची ‘स्वच्छता वारी’ कोल्हापूर, सांगलीत पोहोचली.

उद्योगपती खारपाटील यांचा मदतरुपाने वाढदिवस साजरा
उरण, नवी मुंबईतील नावाजलेले उद्योगपती आणि पी.पी. खारपाटील कंपनीचे मालक पी.पी. खारपाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाचा कोणताही बडेजाव न करता ती रक्कम कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून देऊन एक आदर्श घालून दिला. खारपाटील यांचा वाढदिवस रक्षाबंधनाच्या दिवशी साजरा करण्यात येतो, मात्र यावर्षी त्यांनी कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या महापुरामुळे वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करून साजरा केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील चिखली गावात त्यांनी अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू आणि औषधांचे वाटप केले. खारपाटील कंपनीचे कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष गावात जावून ही मदत पोहोचवली. खारपाटील यांनी अनेक संस्था, राजकीय पक्ष यांना देखिल पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी आर्थिक मदत केली.

संत गाडगे बाबा आश्रमशाळेला शैक्षणिक साहित्य
महापुराचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला, तसा तो संत गाडगेबाबा आदिवासी आश्रमाला बसला. त्यामुळे वाशिंद या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी निर्मल युथ फाऊंडेशन डोंबिवली आणि आपुलकी प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी आश्रमास प्रत्यक्ष भेट देऊन पाट्या, वह्या इत्यादी शैक्षणिक साहित्य आणि स्टेशनरी देऊन मदत केली.
आपली सामाजिक बांधिलकी जपत निर्मल युथ फाऊंडेशनच्या अध्यक्षा अक्षता औटी, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास चव्हाण, आणि ऑल स्टार कॅपिटलचे चेअरमन राजन कुंभार इत्यादी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि आश्रमातील विद्यार्थ्यांना सावरण्याचे बळ दिले.

प्रयाग चिखली पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी महापूर आले. पूरस्थिती निर्माण झाल्याने प्रचंड नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यामुळे सरकार यंत्रणा, निमसरकारी, खासगी नोकरदार, सर्वसामान्य लोकांनी मदतीचा ओघ सुरू केला. यासाठी मुंबईतील राजपत्रित अधिकारी अभियंते, लावणी कलावंत महासंघ, रोटरी क्लब ऑफ नॉर्थ एन्ड, साप्ताहिक ‘धगधगती मुंबई’ यांच्या वतीने कोल्हापूर येथील प्रयाग चिखली या गावातील प्रत्येक कुटुंबाला घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तू, महिलांना साड्या, अंतर्वस्त्रे, पुरुषांना मुलांना कपडे, टॉवेल, ब्लँकेट्स, चादरी, शालेय मुलांना वह्या पेन त्याचबरोबर त्यांचे प्रथमोपचार म्हणून चेकअप, औषध, संसारासाठी भांडी या सर्व वस्तू घरपोच देऊन त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न या सर्व ग्रुप द्वारे करण्यात आला.

First Published on: August 20, 2019 5:03 AM
Exit mobile version