धमकावून मुलीकडून घेतला तिचा न्यूड व्हिडिओ; स्नॅपचॅटव्दारे केला व्हायरल

धमकावून मुलीकडून घेतला तिचा न्यूड व्हिडिओ; स्नॅपचॅटव्दारे केला व्हायरल

नाशिक : सोशल माध्यमांमधील स्नॅपचॅटने तरुणाईला वेड लावले असून, अनेकजण आपले फोटो स्नॅपचॅटच्या माध्यमातून शेअर करत आहेत. मात्र, याच स्नॅपचॅटमुळे वापरकर्त्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे नाशिकमधील एका घटनेवरुन समोर आले आहे. एका मुलीने अनोळखी तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट वर्गमित्र असल्याची समजून स्विकारत चॅटिंग सुरु केले. त्यातून तरुणाने तिला ब्लॅकमेल करत न्यूड व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने जानेवारी २०२३ मध्ये घरातील मोबाईलवर स्नॅपचॅटचे अकाऊंट सुरु केले. त्यावर तिने आईने फोटो काढले होते. शिवाय, ती मैत्रिणींशी स्नॅपचॅटवर चॅटींग करायची. त्यावेळी तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. शाळेतील कोणीतरी मित्र असेल असे समजून तिने ती रिक्वेस्ट स्विकारली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटींग सुरु झाले. ही बाब घरातील कोणलाही माहिती नव्हती. शिवाय, दोघांमध्ये संवाद दिवसेंदिवस वाढत गेला. त्यातून मुलीने विश्वासाने त्यांच्याकडे मनमोकळे केले. शिवाय, आयुष्यातील काही अनुभव शेअर केले. मात्र, अनोळखी तरुणाने विश्वासघात केला. अनोळखी तरुणाने तिला ब्लॅकमेल करणे सुरु केले. तिला धमकी देत न्यूड व्हिडीओ स्नॅपचॅडवर अपलोड करण्यास भाग पाडले. व्हिडीओ अपलोड होताच तरुणाने तो सोमवारी (दि.६) दुपारी वाजता स्नॅपचॅट व इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. ही बाब तिच्या कुटुंबियांना समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी मुलीला विश्वासात घेत विचारणा केली असता तिने आपबिती सांगितली.

घटनेचे गांभीर्य ओळखत पीडित मुलीच्या आईने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पोलिसांना घटनाक्रम सांगत फिर्याद दिली. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

अशी घ्या खबरदारी

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार देवळाली कँम्प पोलीस ठाण्याचे पोलीस व नाशिक शहर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. लवकर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात येईल. : कुंदन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवळाली कॅम्प

ओळखी व्यक्तीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली तरी तो आयडी त्याच व्यक्तीचा आहे की नाही, याची खात्री करावी. त्यानंतर रिक्वेस्ट स्विकारावी. अनोळखीने विश्वास संपादन करत संवाद साधला तरी खासगी माहिती देवू नये. अनोळखी व्यक्ती दुसर्‍याच्या नावाने बोलत असतो. मोबाईलचा कॅमरा नेहमी झाकून ठेवावा. त्यामुळे सायबर धोका निर्माण होणार नाही. : तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

First Published on: February 10, 2023 12:15 PM
Exit mobile version