ऐतिहासिक वास्तूंसाठी हेरिटेज वॉक

ऐतिहासिक वास्तूंसाठी हेरिटेज वॉक

Girija

मावळ तालुक्यातील गडकिल्ले व अतिप्राचीन असलेली लेणी, अशा सर्व ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन व्हावे, त्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा हक्क यादीत नोंद व्हावी, या करीता संपर्क बालग्राम संस्थेच्या वतीने हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. भाजे लेणी ते लोहगड किल्ला या वॉकमध्ये खासदार संभाजीराजे, अभिनेत्री गिरीजा ओक, मावळचे आमदार बाळा भेगडे, संपर्कचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, कमांडर श्रीनिवासन, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, सरपंच चेतन मानकर, सत्येंद्रराजे दाभाडे सरकार यांच्यासह सुमारे पाच ते सहा हजार नागरिक सहभागी झाले होते.

खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते भाजे गावात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेआठ वाजता या हेरिटेज वॉकला सुरुवात करण्यात आली. तलवारबाजी व मर्दानी खेळाच्या साहसी प्रदर्शनाने सुरुवात झालेल्या या वॉकदरम्यान नागरिकांना महाराष्ट्राची प्राचीन संस्कृती अनुभवायला व पाहायला मिळाली. यामध्ये जात्यावर दळण दळणार्‍या महिला, तुळशी वृंदावनाला फेर धरून गाणी म्हणणार्‍या महिला, भजनकरी मंडळी, पोवाडे गाणारे शाहीर, वासुदेव, मल्लखांब यांच्यासह शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. वॉकमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना मक्याचे कणीस, वडापाव, पिठलं भाकरी, मिरचीचा ठेचा असे मराठमोळे खाद्य पदार्थ देण्यात आले होते.

First Published on: November 27, 2018 5:33 AM
Exit mobile version