प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश

प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाने दोन आठवड्यांचा मोठा दिलासा दिला आहे. प्रवीण दरेकर यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होती. परंतु वेळेअभावी ही सुनावणी आज पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत दरेकरांना अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर एमआरए मार्ग पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यामध्ये त्यांना संरक्षण देण्यात आलं आहे. मात्र, दोन आठवड्यानंतर याप्रकरणी कधी सुनावणी पार पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्यातरी दरेकरांवर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई होऊ शकणार नाहीये. याआधी जेव्हा सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी पार पडली होती. तेव्हा प्रवीण दरेकर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबद पोंडा यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी बाजू प्रदीप घरत यांनी मांडली होती. तसेच दोन दिवसानंतर हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर दरेकरांची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली होती. परंतु काल हायकोर्टात दरेकरांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज हायकोर्टात सुनावणी पार पडणार होती. मात्र, ही सुनावणी आता दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली असून प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणात सूड बुद्धीने माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, याला मी कसोटी समजत असून या कसोटीला न्यायालयाच्या माध्यमातून खरा उतरणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया आणि कायद्याला मानणारा नागरिक असल्याने मला तिसऱ्यांदा न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयातही मला न्याय मिळेल, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.


हेही वाचा : भाजपची काळी जादू चालणार नाही; मविआ सरकार ५ वर्ष चालणार – नाना पटोले


 

First Published on: March 29, 2022 5:31 PM
Exit mobile version