रायगडावरील उत्खननात सापडल्या ऐतिहासिक वस्तू

रायगडावरील उत्खननात सापडल्या ऐतिहासिक वस्तू

ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर पुरातत्व विभागाच्यावतीने सुरू असलेल्या उत्खननात मातीत गाडला गेलेला ऐतिहासिक वारसा समोर येत असून, गेल्या काही दिवसांत धातूची समई, नाणी, अंगठी यासह महिलेच्या हातातील नक्षीकाम केलेली पूर्ण अशी सोन्याची बांगडी सापडली आहे.

रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ल्यावर विविध विकासकामे केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जुन्या घरांच्या जोत्यांचे (पाया) उत्खनन सुरू आहे. यामध्ये अनेक वस्तू बाहेर आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी श्री जगदिश्वर मंदिर परिसरात अशाच प्रकारे उत्खनन सुरू असताना आणखी काही वस्तू समोर आल्या. यामध्ये एक समई, अंगठी, बांगडी आणि नाणी सापडली आहेत. याबाबत प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी आश्चर्य व्यक्त करीत पुरातत्त्व विभागाचे कौतुक केले आहे.

सापडलेली बांगडी नक्षीकाम केलेली असून, ती पूर्ण असल्याचे सांगून संभाजीराजे यांनी अशा उत्खननातून इतिहासाला एक वेगळे वळण मिळणार असल्याचे, तसेच मातीत दडलेला इतिहास बाहेर येण्यास मदतही होणार असल्याचे स्पष्ट केले. गडावर ३५० वाड्यांचे उत्खनन केले जाणार असून, आतापर्यंत १५ ठिकाणी उत्खनन झाल्याचे त्यांनी सांगितले. सापडलेला हा ठेवा औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या वस्तू संग्रहालयात नेण्यात येणार असून, त्यावर संशोधन केले जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक दुर्मिळ वस्तू सापडल्या असून, त्या औरंगाबाद येथे पुरातत्व खात्याच्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, हा ठेवा इथेच गडावर जपून ठेवण्यात यावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांसह इतिहासप्रेमी आणि पर्यटकांची मागणी आहे. प्राधिकरणाकडून विकासाची जी कामे केली जाणार आहेत त्यात वस्तू संग्रहालयही प्रस्तावित असून, गडावर सापडलेल्या वस्तू याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत, जेणेकरून येणार्‍यांना हा मौल्यवान ठेवा पाहण्याचा आनंद घेता येईल.

First Published on: April 3, 2021 4:15 AM
Exit mobile version