कंटेनर यार्ड मालकाकडून रस्ता गिळंकृत!

कंटेनर यार्ड मालकाकडून रस्ता गिळंकृत!

मुजोर झालेले कंटेनर यार्डांचे मालक, प्रकल्प अधिकारी हे स्थानिक रहिवाशांसह शेतकर्‍याचे पारंपरिक रस्ते, पाण्याचे मार्ग बंद करून त्यांना वेठीस धरण्याचे काम करत असल्याच्या घटना तालुक्यात वारंवार समोर येत आहेत. याचे ताजे उदाहरण दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील दिसून आले आहे. एसपीएस इंटर मॉडेल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे केमिकल कंटेनर हाताळणार्‍या कंपनीच्या व्यवस्थापन अधिकार्‍यांनी धक्कादायक प्रकार केला आहे. त्यांनी शेतकर्‍यांचा पूर्वापार असणार्‍या रस्तावरच संरक्षण भिंतीचे बांधकाम केले आहे. त्यातून रस्ता गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे.

ग्रामपंचायती, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिडको यांना हाताशी धरून नागरिकांच्या रहदारीच्या रस्त्यावर कंटेनर यार्डचे मालक, प्रकल्पाचे व्यवस्थापक अधिकारी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्त्यावर उभ्या राहणार्‍या कंटेनर, ट्रेलरमुळे अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात दिघोडे ग्रामपंचायत हद्दीत सध्या उभ्या राहणार्‍या ‘एसपीएस’ने रहदारीच्या रस्तावर दगड, सिमेंटची संरक्षण भिंत उभारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे रहदारीचा रस्ता बंद झाला आहे.

आजूबाजूच्या शेतीवर, घरी ये-जा करणार्‍या शेतकर्‍यांना, तसेच अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे ये-जा करणार्‍या रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिघोडे गाव समितीचे अध्यक्ष प्रभू पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, याबाबत तक्रार केल्यानंतर प्रकल्प व्यवस्थापन, मालक यांनी शेतकर्‍यांच्या रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करणार नसल्याचे लेखी उत्तर दिले होते. परंतु शासकीय यंत्रणांना हाताशी धरून संरक्षण भिंत उभारण्याचे काम केले आहे. शेतकर्‍यांनी विरोध केला असता पोलिसांनी शेतकर्‍यांना जेलची हवा खाण्याची धमकी दिली. दिघोडे ग्रामपंचायतीने शेतकर्‍यांच्या तक्रारीनुसार संबंधित कंटेनर यार्डला काम बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

First Published on: October 14, 2019 4:17 AM
Exit mobile version