देश तोडणार्‍यांच्या मनात भय उत्पन्‍न करा

देश तोडणार्‍यांच्या मनात भय उत्पन्‍न करा

भाजप अध्यक्ष अमित शहा

जे लोक देश तोडण्याचे काम करत आहेत, अशांच्या मनात भय उत्पन्न करणे हे राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे (एनएसजी) काम आहे. जर हे लोक आताही ऐकत नसतील तर एनएसजीने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. पश्चिम बंगालच्या राजारहाट येथे एनएसजी-च्या २९ व्या स्पेशल कंपोझिट ग्रुपच्या उद्घाटन-प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माझ्यासाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे.

एनएसजीसाठी ज्या ज्या सुविधांची आवश्यकता आहे त्या सर्व देण्याच्यादृष्टीने आम्ही एक एक पाऊल पढे टाकत आहोत. एकाच वेळी सुमारे २४५ कोटी रुपयांच्या विविध योजनांचे लोकार्पण आण भूमिपूजन करण्याचे काम झाले आहे. पाच वर्षांमध्ये एनएसजीने भारत सरकारकडून केलेल्या अपेक्षांची पूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. सरकार एनएसजीला चांगल्या सुविधा, चांगले घर नक्कीच देईल.

शिवाय त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्व गरजांची पूर्तीही करेल. मात्र युद्ध हे हत्यारांवर नाही, तर बहादुरी आणि हिमतीवर जिंकले जाते असेही शहा म्हणाले. युद्ध हे हिमतीवर जिंकले जाते, हत्यारे तर केवळ एक भूमिका निभावत असतात. सामुग्री आणि तंत्रज्ञान कधीही बहादुरीचे स्थान घेऊ शकणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.

डाव्यांची घोषणाबाजी
गृहमंत्री अमित शहा रविवारी सकाळी कोलकाता विमानतळावर पोहोचले असता त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. अनेक राजकीय पक्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) विरोध दर्शवत विमानतळाबाहेर ’वापस जाओ’च्या घोषणा दिल्या. पश्चिम बंगालचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी अन्य नेत्यांसोबत विमानतळावर शहा याचे स्वागत केले. डावे पक्ष आणि काँग्रेसच्या शेकडो निदर्शकांनी हातात सीएए विरोधी फलक घेत नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली.

सीएएवरून माघार नाही
कोलकाताच्या शहीद मैदानात सीएए समर्थनात आयोजित जाहीर सभेत अमित शहा यांनी सीएएवरून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. पण आम्ही सीएएबाबत मागे हटणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतासह राज्यात सत्तेत येईल. विरोधी पक्षात असताना ममता बॅनर्जींनी शरणार्थींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीएए कायदा आणलाय तर ममता बॅनर्जी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत जाऊन विरोध करत आहेत, असे अमित शहा म्हणाले.

First Published on: March 2, 2020 7:01 AM
Exit mobile version