पालघर मॉब लिंचिंग : हल्लेखोरांमध्ये एकही मुस्लीम बांधव नव्हता, गृहमंत्र्यांचा खुलासा

पालघर मॉब लिंचिंग : हल्लेखोरांमध्ये एकही मुस्लीम बांधव नव्हता, गृहमंत्र्यांचा खुलासा

काही दिवसांपूर्वी पालघरच्या आदिवासी भागात दोन साधूंना एका जमावाने मारहाण करत जीवे मारल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेला नंतर हिंदू-मुस्लीम वादाचा रंग चढवला जाऊ लागला होता. मात्र, आता या घटनेतील सर्व १०१ हल्लेखोरांची नावं समोर आली असून त्यामध्ये एकही मुस्लीम बांधव नाही, असं स्पष्टीकरणवजा खुलासा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आता या वादाच्या हिंदू-मुस्लीम रंगावर पडदा पडला आहे. या सर्व १०१ लोकांना पोलिसांनी घटनेनंतरच्या ८ तासांमध्ये आसपासच्या जंगली भागातून शोधून ताब्यात घेतलं आहे, असं देखील गृहमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी ‘ओये बस’चा ‘शोएब बस’ कसा झाला, याचा देखील खुलासा केला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

ओये बस ते शोएब बस!

यावेळी गृहमंत्र्यांनी या घटनेला जातीय-धार्मिक रंग देण्यात आल्याच्या प्रकाराची निंदा केली. ‘घटना घडली, तेव्हा जमावामध्ये ‘ओये बस’, ‘ओये बस’ असं तिथले लोकं म्हणत होते. पण त्याचा अपभ्रंश ‘शोएब बस’, शोएब बस’ असा करण्यात आला आणि त्यातून या घटनेला वेगळा अर्थ देण्यात आला’, असं गृहमंत्री म्हणाले. मुलं पळवून नेणारी टोळी सक्रिय झाली असल्याच्या अफवेतून हा प्रकार घडल्याचं देखील अनिल देशमुखांनी नमूद केलं. ‘आज संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाची लढाई लढतोय. आरोग्य यंत्रणा लढतेय. अशा काळात जातीचं, धर्माचं राजकारण केलं गेलं. ही राजकारण करण्याची वेळ नाही. एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे’, असं देखील ते म्हणाले.

‘वाधवान कुटुंबाला सोडणार नाही’

दरम्यान, यावेळी अनिल देशमुखांनी वाधवान प्रकरणी देखील स्पष्टीकरण दिलं. ‘एका मोठ्या चुकीमुळे वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी अधिकाऱ्याने दिली होती. त्यांचा आज दुपारी २ वाजता क्वॉरंटाईन संपतोय. यावर सीबीआय आणि ईडीला आम्ही पत्र लिहून त्यांना ताब्यात घेण्याची विनंती केली आहे. सीबीआय त्यांना ताब्यात घेत नाही, तोपर्यंत ते आमच्याच ताब्यात राहतील’, असं ते म्हणाले. तसेच, ‘मधल्या काळात काही लोकं जसे लंडनला पळाले, त्या पद्धतीने महाराष्ट्र शासन या वाधवान कुटुंबाला पळू देणार नाही’, अशी खोचक टीका देखील देशमुख यांनी भाजपवर केली.

First Published on: April 22, 2020 9:56 AM
Exit mobile version