पोलिसांकडून जबरदस्तीने‌ वसुली करून घेणारा गृहमंत्री महाराष्ट्र सहन करणार नाही!  

पोलिसांकडून जबरदस्तीने‌ वसुली करून घेणारा गृहमंत्री महाराष्ट्र सहन करणार नाही!  

विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी निवडणूक मोदीच जिंकतील, चंद्रकांत पाटलांचे विधान

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत एक खळबळजनक खुलासा केला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्यापोटी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा दावा परमबीर सिंह यांनी या पत्रात केला आहे. त्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकार आणि गृहमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यापाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने आपल्या कामगिरीने हे सिद्ध केले आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचे पूर्णपणे गुन्हेगारीकरण झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दरमहा शंभर कोटींची वसुली करण्यास सांगितले होते. पोलिसांकडून जबरदस्तीने‌ वसुली करून घेणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

तसेच गृहमंत्र्यांनी आज रात्री राजीनामा दिला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी केली नाही, तर उद्या (रविवारी) भाजप कार्यकर्ते संपूर्ण राज्यभर आंदोलन करतील आणि सरकारला गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. आता केवळ अनिल देशमुख यांनी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र सरकारला राजीनामा द्यायला हवा. अनिल देशमुख यांची १०० कोटींची गोष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांना ठाऊक होती. असे असतानाही हे सर्व गप्प होते, असेही पाटील म्हणाले.

First Published on: March 20, 2021 10:09 PM
Exit mobile version