पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार – अनिल देशमुख

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार – अनिल देशमुख

हायकोर्टाकडून देशमुखांना १४ दिवसांची ईडीची कोठडी

पूजा चव्हाण प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठ दिवसानंतर भाष्य केले आहे. यावेळी पूजा चव्हाण प्रकरणी विरोधक करत असलेला आरोप चुकीचा आहे. वन मंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली असल्याने पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचीही चौकशी करण्यात येण्याचे स्पष्ट संकेत असल्याचे दिसतंय.

पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. तर पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचा राजीनामा घेऊन नंतरच त्यांची चौकशी करावी अशी मागणी विरोधकांकडून होत असताना संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले तर, चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

२३ वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितले होते. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवले. त्यानंतर पूजाने हे टोकाचे पाऊल का उचलले याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले. राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी पुढे आली. तेव्हापासूनच संजय राठोड नॉटरिचेबल आहेत.

First Published on: February 15, 2021 3:13 PM
Exit mobile version