सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय ऐच्छिक, सरकारचा विरोध नाही – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय ऐच्छिक, सरकारचा विरोध नाही – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेत ३ मेपर्यंतचा अल्टिमेटमच दिला असून त्यानंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस देखील सक्षम असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारची धावाधाव सुरू असल्याचं पहायला मिळतयं. दिलीप वळसे पाटील यांनी आज राज्यातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक देखील उपस्थित होते. बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय ऐच्छिक असून सरकारचा त्याला विरोध नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

काही जणांकडून विनाकारण वातावरण तापवलं जातंय

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सर्व मंदिरांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाते, मग मशिदींमध्येच सीसीटीव्ही का बसवले जात नाहीत, असा सवाल केला. त्यावर वळसे-पाटील म्हणाले की, कुठल्याही धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यास काहीच हरकत नाही. मंदिर प्रशासन याबाबत पुढाकार घेऊ शकते. मात्र, काही जणांकडून विनाकारण वातावरण तापवले जात आहे. त्याकडे जास्त लक्ष देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय ऐच्छिक

मंदिरात सीसीटीव्ही आहेत तर मग मशिंदींमध्ये सीसीटीव्ही का नाहीत? असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला. यावर बोलताना वळसे पाटील यांनी सांगितले की, कोणत्याही धार्मिक स्थळावर सीसीटीव्ही लावण्यास राज्य सरकार सक्ती करत नाही. ज्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावायचे आहेत त्यांनी ते स्वत:हून लावावेत. जो तो आपापल्या स्वऐच्छेनेप्रमाणे निर्णय घेऊ शकतो.

नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया…

गृहमंत्र्यांकडून सर्वांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवीन भोंगे लावण्याच्या नियमावलीबाबत भोंगे बनणार आहेत. चुकीच्या पद्धतीने भोंगे लावण्यात आले असून यावर काय करणार, याबाबत काहीही स्पष्टता नाहीये. नवीन भोंगे लावण्यापेक्षा जे जुने आहेत आणि सातत्याने कायद्याकडे दुर्लक्ष करून जे हवं ते करतायत, याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये, असं मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले.

कायदा व सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर

कायदा व सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबतीत सरकार अतिशय गंभीरतेने घेत आहे. संघर्ष वाढवू नका, हीच माझी सर्वांना विनंती आहे. तसेच तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, अशा प्रकारची कृती जर कोणाकडून झाली, तर त्या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही वळसे पाटील यांनी दिला आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंसह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावणार, दिलीप वळसे-पाटलांची माहिती


 

First Published on: April 20, 2022 4:11 PM
Exit mobile version