…तर रझा अकादमीवरही कारवाई होणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा इशारा

…तर रझा अकादमीवरही कारवाई होणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा इशारा

पोलीस यंत्रणेतील त्रुटींसंबंधित अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार, दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई : अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर रझा अकादमी संदर्भात पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये जर त्यांची भूमिका दिसली तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. दंगलीतील दोषींवर कारवाई होईलच, असा स्पष्ट इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी येथे दिला.

त्रिपुरामधील घटनेनंतर अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये दंगल उसळली होती. पोलिसांनी यासंदर्भात गृह विभागाला अहवालही सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी अमरावतीतील दंगलीखोरांवर कठोर कारवाईचे संकेत दिले.

दंगल होऊ शकते अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. पण येवढ्या मोठ्या प्रमाणावर होईल असे वाटले नव्हते. बांगलादेशात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्रिपुरामध्ये आंदोलन झाले आणि त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी एका संघटनेने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. त्यातून दगडफेकीसारख्या घटना झाल्या. ते शांत झाल्यानंतर एका राजकीय पक्षाने बंदची हाक दिली आणि पुन्हा तसाच प्रकार घडला. ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय दुर्देवी आहे, असे वळसे पाटील म्हणाले.

पण अशा घटना घडत आहेत की घडवल्या जात आहेत या संदर्भात आम्ही चौकशी करीत आहोत. चौकशीचा निष्कर्ष आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दंगलीत रझा अकादमीची भूमिका दिसली तर त्यांच्यावरही कारवाई होईलच, पण यामध्ये यामध्ये कुठला राजकीय पक्ष अथवा कुणी नेता असेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असेही वळसे- पाटील यांनी सांगितले.


हेही वाचा: पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करा, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


 

First Published on: November 18, 2021 8:15 PM
Exit mobile version