ऑनर किलिंगची घटना गंभीर; कुठे आहेत जिल्ह्याच्या गृहमंत्री? – धनंजय मुंडे

ऑनर किलिंगची घटना गंभीर; कुठे आहेत जिल्ह्याच्या गृहमंत्री? – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

बीडमधील ऑनर किलिंगची घटना अतिशय गंभीर आहे. पोलिसांना सामान्यांच्या सुरक्षेशी कर्तव्य नाही. उलट या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारालाच पोलिसांनी अटक केली आहे. यावरून ते एका पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आहेत. स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आणि आता जिल्ह्याच्या गृहमंत्री म्हणवून घेणाऱ्या बीडच्या पालकमंत्री कुठे आहेत? असे रोखठोक मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडें यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.

प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावानेच तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. सुमित वाघमारे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुमितचा दोन महिन्यापूर्वी भाग्यश्रीसोबत प्रेम विवाह झाला होता. सुमितशी लग्न केल्याचा राग मनात ठेवूनच भाग्यश्रीच्या भावाने त्याची हत्या केली. हे सगळे दिवसाढवळ्या घडले तेव्हा पोलिसांचा धाक पूर्णपणे संपला असून कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा झालेत हे उघड आहे. बीडमधील सर्व गुंडगिरी मी संपवली असून जिल्ह्यासाठी मीच गृहमंत्री आहे, असे पालकमंत्री पंकजा मुंडे काही दिवसांपूर्वी बोलल्या होत्या. या विधानाचा दाखला देत मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली आहे.

“केवळ जिल्ह्यांतच नाही तर राज्यात मोठे मोठे अपराध होत आहेत मात्र गृहखाते सुस्त आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. सुमितवर हल्ला करणारे तिघेही आरोपी घटनेनंतर फरार झाले असून पोलिसांनी गुन्हेगारांना पकडायचे सोडून या घटनेची बातमी करायला गेलेल्या पत्रकाराला अटक करणे हे लोकशाहीला घातक आहे. बीड पोलीस एका पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेत असतात हे स्पष्ट आहे” असा घणाघाती आरोपही धनंजय मुंडेंनी यावेळी केला.

First Published on: December 20, 2018 7:06 PM
Exit mobile version