हॉटेल्स-लॉजिंग ८ जुलैपासून सुरू

लॉकडाऊनमुळे राज्यभरातील उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. मिशन बिगीन अगेनच्या दोन टप्प्यांमध्ये सारेच व्यवसाय सुरू झाले होते. मात्र, हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. आता राज्यभरातील हॉटेल्स , लॉजिंग येत्या 8 जुलैपासून सुरू होणार आहेत. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या पर्यटनात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले होते. यानंतर सोमवारी याचे आदेश काढण्यात आले आहेत.

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरसारख्या शहरांसाठी तसेच महापालिका असलेल्या शहरांसाठी वेगळी अट घालण्यात आली आहे. याठिकाणच्या कंटेन्मेंट झोनपासून बाहेर असलेल्या हॉटेलना ही परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज हे त्यांच्या क्षमतेच्या 33 टक्के ग्राहकांना राहण्याची परवानगी देऊ शकणार आहेत. तसेच उर्वरित राज्यासाठीदेखील 33 टक्के क्षमतेची अट घालण्यात आली आहे.

हे हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊस क्वारंटाईन सेंटर केली गेली असतील तर ती पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकणार आहे. तसेच 33 टक्के क्षमता ग्राहकांसाठी वापरल्यानंतर उरलेली 67 टक्के क्षमता ही क्वारंटाईनसाठी वापरण्याचे अधिकार हे सर्वस्वी स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.

यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते. यावेळी ठाकरे यांनी हॉटेल मालकांना कोणत्याही कर्मचार्‍याला कामावरून कमी करू नका असे आवाहन केले आहे. हॉटेल्समध्ये येणार्‍या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात येऊ शकतात. राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागेल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

हे आहेत नियम

१)हॉटेलच्या क्षमतेनुसार फक्त ३३ टक्के ग्राहकांना संमती देण्यात येणार

२)रेस्तराँमध्ये फक्त राहण्याची संमती असेल

३) ग्राहकांचे थर्मल स्क्रिनिंग करणे आवश्यक

४) सॅनिटायझरचा वापर सक्तीचा असणार आहे.

५) हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये असलेले गेमिंग झोन, स्विमिंग पूल आणि जिम बंद राहणार

६) हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांसाठी मास्कचा वापर बंधनकारक

First Published on: July 7, 2020 6:33 AM
Exit mobile version