सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत सापडली कवटी आणि सांगाडा, परिसरात घबराट!

सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत सापडली कवटी आणि सांगाडा, परिसरात घबराट!

पाण्याच्या टाकीत सापडली कवटी आणि मानवी सांगाडा

पावसाळ्यानंतर परिसरातल्या सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत पाणी साठून राहिल्यामुळे ती स्वच्छ करण्याच्या अपेक्षेने नागरिकांनी ही टाकी खाली केली. पण टाकीच्या तळाशी कचऱ्याऐवजी मानवी कवटी आणि हाडांचा सांगाडा सापडल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. पिंपरीच्या टेल्को रोडवरच्या बालाजी नगर झोपडपट्टी परिसरात हा प्रकार घडला आहे. बालाजीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी हे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलं आहे. कवटी दिसताच रहिवाशांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. MIDC भोसरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नक्की झालं काय?

बालाजीनगर झोपडपट्टीतील काही नागरिकांनी सार्वजनिक शौचालयावरच्या टाकीत अनेक महिन्यांपासून साठून राहिलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी टाकी रिकामी केली. मात्र, या टाकीच्या तळाशी त्यांना एक पूर्ण वाढ झालेली मानवी कवटी आणि एक पिशवी सापडली. ही पिशवी उघडून पाहाताच स्थानिकांना धक्का बसला. या पिशवीमध्ये मानवी हाडांचा सांगाडा सापडल्यामुळे झोपडपट्टीमध्ये खळबळ माजली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी लागलीच MIDC भोसरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मानवी कवटी आणि सांगाडा असलेली पिशवी ताब्यात घेतली. हा सांगाडा पुरुषाचा आहे की स्त्रीचा, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. शिवाय, किती दिवसांपासून हा सांगाडा तिथे आहे? कुणी टाकला? सांगाडा नक्की आहे कुणाचा? हे प्रश्न देखील अद्याप अनुत्तरीतच असून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

First Published on: November 17, 2020 5:48 PM
Exit mobile version