पतीपत्नीच भांडण; सर्पमित्राने ‘कोब्रा’नागाचा दंश करून घेत दिला जीव

पतीपत्नीच भांडण; सर्पमित्राने ‘कोब्रा’नागाचा दंश करून घेत दिला जीव

नाशिक :  पती-पत्नी मधील वाद अत्यंत सामान्य गोष्ट आहे. परंतु, कधी-कधी हे वाद इतके विकोपाला पोहचतात की त्यातून नको ते घडून जाते. अशीच एक घटना सिन्नर येथे घडली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सिन्नरमध्ये एका सर्पमित्राने पत्नीसोबत झालेल्या वादानंतर थेट त्याने पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागासमोर स्वताचा चेहरा नेत दंश करून घेतला. अत्यंत विषारी असलेल्या कोब्राचा दंश होताच सर्पमित्राचा मृत्यू झाला. नागेश श्रीधर भालेराव असे मृत्यू झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. सिन्नर शहरातील एका महाविद्यालय परिसरात शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सर्पमित्र नागेश भालेराव याने हा कोब्रा जातीचा नाग पकडला होता.

नागेश भालेराव आणि त्याची पत्नीत मागील अनेक दिवसापासून वाद होते. त्यांचे पटत नसल्याने त्यांचे वारंवार खटके उडायचे, त्यांच्यातील हा कौटुंबिक वाद इतका टोकाला गेला की त्यात अखेर नागेश याचा जीव गमवावा लागला. नागाचा दंश करून घेण्याच्या दोन दिवसांपूर्वी नागेशने एक व्हिडिओ क्लिप बनवत जीवाचे बरे वाईट करेल, असे म्हटले होते. त्यानंतर सिन्नर शहरातील एका महाविद्यालय परिसरात त्याने एक कोब्रा जातीचा नाग पकडला. याच सापाचा दंश करून घेत त्याने आपल जीवन संपवले आहे. नागेश सिन्नर शहरात सर्पमित्र म्हणून परिचित झाला होता. एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम करून तसेच होर्डिंग चिटकवण्याचे, मिळेल ते काम काम करून नागेश कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नागेशने तयार केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्टॅम्प पेपरवर विवाहात फसवणूक झाल्याचा उल्लेख केला आहे. पत्नीकडून नागेश व त्याच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास होत असल्याचे त्याने स्टॅम्प पेपर वर नमूद केले होते.

First Published on: November 16, 2022 2:15 PM
Exit mobile version