उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो – संजय राऊत

उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो – संजय राऊत

मुख्यमंत्र्यांच्या सभेतून राज्यातील गढूळपणा दूर होईल, संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

आम्ही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहत असून, आता फक्त राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करायची वेळ आली आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेनेचा आज ५४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यावेळी राऊत बोलत होते. यंदा राज्यात कोरोनाचे संकट असल्याने शिवसेनेने आपला वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्हच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांशी संवाद साधला. दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी पाहण्याचे स्वप्न तर पूर्ण झाले. पण, आता आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो आहे. आता फक्त राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करायची वेळ आली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

याचबरोबर, देशावर आलेल्या कोरोना संकट आणि चीन कुरापतींवर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केले. तसेच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, म्हणून महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करू शकत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. याशिवाय, आता पूर्ण सत्ता हाती यायचे स्वप्न आहे. शिवसेनेचे १८० आमदार येतील, तेव्हाच खरे स्वप्न पूर्ण होईल, असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी शिवसैनिकांनी तन-मन-धन अर्पण करुन काम केले तर आगामी काळात महाराष्ट्रात शिवसेनेचे १८० ते २०० आमदार निवडून येतील, असे वक्तव्य करत आगामी काळात शिवसेना राष्ट्रीय स्तरावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी संकेत दिले.  शिवसेना बलाढ्य तर राज्य बलाढ्य ही संकल्पना घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. देशाच्या पंतप्रधानपदी शिवसैनिक बसेल, असे काम करुयात असे देखील ते म्हणालेत.

First Published on: June 19, 2020 7:24 PM
Exit mobile version