तुकाराम मुंढेंचा पॅटर्नच वेगळा, नागपूरमध्ये भिकारी, बेघरांचे ‘स्किल डेव्हलपमेंट’

तुकाराम मुंढेंचा पॅटर्नच वेगळा, नागपूरमध्ये भिकारी, बेघरांचे ‘स्किल डेव्हलपमेंट’

आयुक्त तुकाराम मुंढेंचा निराधाराना आधार

कोरोना विषाणूमुळे ज्याप्रकारे जगातील महासत्ता जेरीस आल्या आहेत. तिथे रस्त्यावर राहणाऱ्यांची काय बिशाद. ज्या लोकांना छप्पर आणि चार भिंती आहेत, ते कसेतरी लॉकडाऊन ढकलत आहेत. मात्र रस्त्यावर राहणारे बेघर आणि भिकारी तर गलितगात्र अवस्थेत पोहोचलेत. अशा लोकांना आधार देण्याचे काम नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे करत आहेत. नुसताच आधार नाही, तर लॉकडाऊन संपल्यानंतर जगण्यासाठी त्यांचे स्किल डेव्हलपमेंट देखील करत आहेत.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आयुक्त तुकाराम मुंढेंनी आपल्या स्टाईलने कामाला सुरुवात केली होती. प्रत्येक वॉर्ड स्कॅन आणि कोबिंग ऑपरेशन करुन रुग्ण शोधण्याची मोहिम त्यांनी हाती घेतली. तर दुसऱ्या बाजुला रस्त्यावर बेघर असलेले, भिक मागणारे भिकारी यांच्यासाठीही एक योजना आखली. नागपूर शहरातील २० निवारा केंद्रात सध्या १,२५२ बेघरांना आसरा देण्यात आला आहे. या सर्वांना दोन वेळचे भोजन, चहा-नाश्ता दिला जातो. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

भिकारी, बेघरांचा मेकओव्हर

लॉकडाऊन संपेपर्यंत बेघऱांना दोन वेळचे अन्न देऊन आपली जबाबदारी संपली, हे माननाऱ्या पैकी मुंढे नक्कीच नाहीत. मुंढेंनी सरकारी बाबूंच्या पुढे जाऊन विचार करत या निराधारांना पुढील आयुष्यासाठी स्वावलंबी बनविण्याचा निर्धार घेतला आहे. यासाठी त्यांनी पहिल्यांदा भिकारी, बेघरांचा मेकओव्हर केला. दाढी वाढलेले, केस वाढलेल्यांची क्लिन शेव्ह करण्यात आली. त्यांना स्वच्छ आंघोळ घालून नवीन कपडे घालायला दिले. ज्यामुळे बेघरांना आत्मविश्वास प्राप्त झाला. या कामासाठी आयुक्त मुंढेंनी एनजीओंची मदत घेतली.

निवारा आणि काम दोन्ही

मुंढेंनी पोटाचा प्रश्न सोडविल्यानंतर कौशल्य विकास करण्याकडे मोर्चा वळविला. निवारा केंद्रातील लोकांना सुतार कामाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवारा केंद्रातील कौशल्यप्रधान लोकांकडूनच हे काम करुन घेतले जात आहे. अनेकांनी प्रशिक्षण घेऊन सुंदर पक्ष्यांचे घरटे तयार केले आहे. तर काहींनी पाककलेचे प्रशिक्षण घेतले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर आता अनेक एनजीओ प्रशिक्षणासाठी पुढे येत आहेत.

 

म्हणून हा अट्टाहास…

आपल्या उपक्रमाबाबत बोलताना मुंढें म्हणाले की, बेघर, भिकारी हे देखील समाजाचा एक भाग आहेत. मनपाने त्यांना निवारा केंद्र उपलब्ध करुन त्यांची तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. मात्र त्यांना
लोकांना व्यस्त ठेवण्याचे मोठे आव्हान असते. बेघरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकास करून आम्ही त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग उपलब्ध करुन देत आहोत.

 

First Published on: April 16, 2020 11:26 AM
Exit mobile version