संजय राऊतांना रहाटे तर खडसेंना खडसणे; फोन टॅपिंगसाठी बोगस नावांचा वापर

संजय राऊतांना रहाटे तर खडसेंना खडसणे; फोन टॅपिंगसाठी बोगस नावांचा वापर

मुंबई : तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोन टॅप करण्यासाठी त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले एस. रहाटे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप करण्यासाठी खडसणे नावाचा वापर केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, संजय राऊत, एकनाथ खडसे, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांच्यासहीत इतर काही नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून मुंबई पोलीस याप्रकरणी त्यांची कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात मुंबई पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्यासोबत 6 जणांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले आहेत. यामध्ये एसीएस होम आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

महाविकास आघाडी स्थापन होण्याआधी आम्ही कोणाशी बोलतो, आमची काय रणनीती ठरत आहे, याची माहिती घेण्यासाठी आमचे फोन टॅप करण्यात आले, असा आरोप संजय राउत यांनी केला आहे. विशेष म्हणजे या फोन टॅपिंगसाठी परवानगी मागताना अँटी सोशल एलिमेंट्स, असे म्हणत अर्ज केल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग आणि महाराष्ट्र एटीएस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या तीन विभागांना फोन टॅप करण्याचे अधिकार आहेत. हे तिन्ही विभाग सलग सहा ते सात दिवस कुणाची रेकी करू शकतात. त्यापुढे त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) यांची परवानगी लागते. परवानगीशिवाय या विभागांनीही फोन टॅपिंग करता येत नसल्याचीही माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे परवानगी नसताना फोन टॅपिंग करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. अधिकृत यंत्रणांव्यक्तिरिक्त कुणालाही कुणाचा फोन टॅप करण्याची परवानगी देता येत नाही. जर एखादी व्यक्तीनं असं काही केले तर त्याला तुरुंगवासाची हवासुद्धा खावी लागू शकते. तसेच कुणी बेकायदेशीररित्या तुमचा फोन टॅप करत असेल तर तुम्ही त्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.


हेही वाचाः मातोश्रीवर येण्याची कोणाची हिंमत नाही तुम्ही घरी जा, मुख्यमंत्री ठाकरेंची शिवसैनिकांना विनंती

First Published on: April 22, 2022 9:08 PM
Exit mobile version