…जर असे होणार असेल तर राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत करु – धनंजय मुंडे

…जर असे होणार असेल तर राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत करु – धनंजय मुंडे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेतील आपल्या भाषणात एकदा काय ते होऊन जाऊ दे असे वक्तव्य केले आहे. याबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. राज ठाकरे कोणाच्या जीवावर होऊन जाऊ दे म्हणतात आणि काय होऊन जाऊ द्यायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

भोंगे काढल्याने आणि हनुमान चालीसा म्हटल्याने देशातील बेरोजगारी संपणार आहे का? किंवा महागाई कमी होणार आहे का? जर असे होणार असेल तर राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत करु. मात्र, तरुणांची माथी भडकवली तर एक पिढी उद्ध्वस्त होईल, असे धनंजय मुंडे म्हणाले. हनुमान चालीसा म्हटल्याने तरुणांना रोजगार मिळणार आहे का? पोटाला भाकरी मिळणार आहे का? किंवा महाराष्ट्र प्रगत होणार आहे का? असे प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारले आहेत. भोंगे काढल्याने आणि हनुमान चालीसा म्हटल्याने नवनिर्माण होणार नाही तर महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल, असे उत्तर ही धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

शरद पवार यांना हिंदुत्वाची अलर्जी आहे असे राज ठाकरे म्हणतात. मग अडीच वर्षांपूर्वी राज ठाकरे यांना कसली अॅलर्जी होती. वातावरणानुसार राज ठाकरे यांची अॅलर्जी बदलत असते का, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाने नाही तर रयतेच्या हिताचे स्वराज्य निर्माण केले आणि त्यालाच अनुसरुन पवार साहेब राजकारणात आणि समाजकारणात काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका केल्याने राज ठाकरे यांना मते मिळतील असे वाटत नाही, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

First Published on: May 2, 2022 7:02 PM
Exit mobile version