करोना व्हायरस : घराबाहेर पडाल तर गोळ्या घातल्या जातील

करोना व्हायरस : घराबाहेर पडाल तर गोळ्या घातल्या जातील

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढील २१ दिवस देशभरात लॉक डाऊन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा मंगळवारी पंतप्रधानांनी केली. परंतु महाराष्ट्र, तेलंगणा, यांच्यासह अन्य काही राज्यांनी आधीच लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तरी देखील नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन न करत घराबाहेर निघत असल्याचे दिसून आले. परंतु आता नागरिक असेच बेजबाबदारपणे वागल्याने सरकारकडे गोळी घातल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे वादग्रस्त विधान तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले आहे.

के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले की, अमेरिकेला लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी सैन्याची मदत घ्यावी लागली होती. त्यामुळे राज्यातही लॉक डाऊन लागू केल्यानंतर नागरिक अत्यावश्यक काम नसतानाही घराबाहेर निघत असतील तर मला २४ तास राज्यात कर्फ्यु लागू करावा लागेल. तसेच नागरिक रस्त्यावर फिरत असल्यास त्यांना दिसत क्षणीच गोळी घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यास सरकारला भाग पाडू नका, असेही चंद्रशेखर म्हणाले. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन असताना देखील नागरिक रस्त्यावर फिरत असल्याने चंद्रशेखर राव यांनी नाराजी व्यक्त केली.

चंद्रशेखर राव पेट्रोल पंप बंद करण्याचा आणि रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी सैन्याची मदत घेण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. रात्री ७ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यु लागू असणार असून सर्व दुकाने सायंकाळी ६ पर्यंत बंद करण्याचे आदेश के. चंद्रशेखर राव यांनी दिले.

First Published on: March 25, 2020 11:55 AM
Exit mobile version