IIT Bombay ने अवघ्या ३ दिवसात शोधले ऑक्सिजन तुटवड्यावर सोल्यूशन

IIT Bombay ने अवघ्या ३ दिवसात शोधले ऑक्सिजन तुटवड्यावर सोल्यूशन

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे पुन्हा एकदा देशाच्या मदतीला धावून आली आहे. देशात Covid-19 रूग्णांच्या उपचारासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) चा तुटवडा पाहता आयआयटीने या समस्येवर एका उपाय आणला आहे. एका प्रायोगिक प्रकल्पामध्ये आयआयटी मुंबईला यश मिळाले असून या प्रकल्पामुळे कोरोनावर उपचार करताना रूग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो असा आयआयटीचा दावा आहे. नायट्रोजन युनिटचे रूपांतर (Pressure Swing Adsorption (PSA) ऑक्सिजन युनिटमध्ये करण्याचा निर्णय आयआयटीने घेतला आहे. या प्रयोगाच्या चाचणीनंतर यशही आल्याचे आयआयटीने स्पष्ट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे सोल्यूशन देशातही देण्याची तयारी आयआयटी मुंबईने दर्शवली आहे. अवघ्या तीन दिवसात हा प्लॅंट उभारून त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत हे विशेष.

आयआयटीमध्ये या प्रायोगिक प्रकल्पासाठी झालेल्या चाचण्यांमध्ये अतिशय आशादायी अशी प्रगती दिसून आली आहे. या प्रयोगाअंतर्गत ऑक्सिजनची निर्मिती ३.५ एटीएम प्रेशनरने करता येऊ शकते असे सिद्ध झाले आहे. त्यामध्ये ऑक्सिजनची शुद्धता ९३ टक्के ते ९६ टक्के या दरम्यान असेल. या गॅस स्वरूपातील ऑक्सिजनचा वापर कोरोनाचे रूग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. हॉस्पिटलच्या ठिकाणी तसेच ज्याठिकाणी सातत्याने ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करायची आहे, अशा ठिकाणी हा प्लॅंट उपयुक्त ठरू शकतो असा आयआयटीच्या संशोधकांचा दावा आहे.

नायट्रोजनचे रूपांतर ऑक्सिजनमध्ये कसे होते ?

नायट्रोजन युनिटचे रूपांतर ऑक्सिजनमध्ये कसे करता येते ? असा सर्वांसमोर असणारा मोठा प्रश्न आहे. नायट्रोजन प्लॅन्टच्या सेटअपमध्ये मॉलेक्युर म्हणजे रेणूंचे कार्बन ते झिओलाईट असे रूपांतर करून ऑक्सिजन निर्मिती शक्य असल्याचे संधोधन आणि विकास विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक मिलिंद अत्रे यांनी सांगितले. मिलिंद अत्रे हे संपुर्ण प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. नायट्रोजन प्लॅंट हे हवेतील ऑक्सिजन घेतात. अशा प्रकारचे प्लॅंट्स हे भारतात अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळेच या प्रत्येक प्लॅंटचे रूपांतर ऑक्सिजन जनरेटर म्हणून केले जाऊ शकते. हा संपुर्ण प्रायोगिक प्रकल्प हा आयआयटी बॉम्बे, टाटा कन्सल्टींग इंजिनिअर्स, स्पॅनटेक इंजिनिअर्स यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या टीमनेच पीएसए नायट्रोजन आणि ऑक्सिजन प्लॅंट प्रॉडक्शनचा प्रायोगिक प्रकल्प उभारला आहे. इंडस्ट्री आणि आयआयटीसारख्या संस्थेच्या समन्वयातून आत्मनिर्भर

भारताच्या दिशेने हे पाऊल असल्याची प्रतिक्रिया टाटा कन्सल्टींग इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली. अनेक अडथळे आल्यानंतरही अतिशय नियोजनबद्ध आणि वेळेत केलेला प्रयोग यशस्वी झाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले. स्पॅनटेकच्या अभियंत्यांनी हा संपुर्ण प्लॅंट उभा केला. त्यामध्ये आयआयटी मुंबई येथील नायट्रोजन सुविधेचा वापर रेफ्रिजेरेशन आणि क्रायोजेनिक्स लॅबच्या माध्यमातून करण्यात आला. अवघ्या तीन दिवसात हा संपुर्ण सेट अप उभारण्यात आला. त्यामध्ये सुरूवातीलाच चांगले परिणाम दिसून आल्याचेही या टीमने स्पष्ट केले.


 

First Published on: April 29, 2021 4:36 PM
Exit mobile version