‘Corona मधून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करणं सक्तीचं करा’!

‘Corona मधून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करणं सक्तीचं करा’!

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता २ लाख ६७ हजारांच्याही वर गेलेला असताना आरोग्य यंत्रणेवरचा ताण मात्र वाढू लागला आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर IMA (Indian Medical Association) ने राज्य सरकारला प्लाझ्मा डोनेट करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे. जे जे रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत, त्यांनी प्लाझ्मा डोनेट करणं सक्तीचं करण्याची मागणी IMAनं केली आहे. आजपर्यंत राज्यात १ लाख ४९ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, त्यातल्या अवघ्या १८० रुग्णांनीच प्लाझ्मा डोनेट केला आहे.

कोरोनावर उपचार करण्यासाठी किंवा किमान तो नियंत्रित ठेवण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी (Plasma Therapy) उपयोगी ठरत असल्याचं अनेक उदाहरणांवरून सिद्ध झालं आहे. प्लाझ्मामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढेलच, मात्र त्यासोबतच मृत्यू होण्याचं प्रमाण देखील कमी होईल, अशी भूमिका आयएमएनं मांडली आहे. सध्या राज्यात ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे, त्यात प्लाझ्मा थेरेपी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. यासाठी रुग्णालयांनी आधीपासूनच रुग्णाचं कौन्सेलिंग करणं आवश्यक आहे. त्यासोबतच बऱ्या झालेल्या रुग्णांच्या संपर्कात राहणं देखील आवश्यक आहे. जेणेकरून रुग्णांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण होऊ शकेल, असं आयएमएकडून नमूद करण्यात आलं आहे.

भितीमुळे प्लाझ्मा डोनेटसाठी अनुत्साह!

प्लाझ्मा डोनेट केल्यामुळे आपल्याला पुन्हा कोरोनाची (Corona Infection) लागण होईल की काय, या भितीमुळे बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढे येत नसल्याचं दिसून आलं आहे. शिवाय, अनेक रुग्णांना एकदा रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा रुग्णालयात पाय ठेवण्याचीही इच्छा होत नसल्यामुळे देखील असं होत आहे. मात्र, प्लाझ्मा डोनेशन मानवतेसाठी आणि लोकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचं आयएमएचं म्हणणं आहे.

बऱ्या झालेल्या रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर २१ ते २८ दिवसांमध्ये प्लाझ्मा डोनेट करता येतो. १५ दिवसातून एकदा प्लाझ्मा डोनेट करता येतो. शिवाय ही प्रक्रिया ४ महिन्यांपर्यंत करता येते. बऱ्या झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्मामध्ये कोरोनाविरोधात तयार झालेल्या अँटिबॉडीज कोरोना रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केल्यास, त्या रुग्णाच्या शरीरात देखील तशाच अँटिबॉडी तयार व्हायला मदत होते.

First Published on: July 15, 2020 1:35 PM
Exit mobile version