आला उन्हाळा, गेला हिवाळा; राज्यातील तापमानात 15 फेब्रुवारीनंतर होणार मोठी वाढ

आला उन्हाळा, गेला हिवाळा; राज्यातील तापमानात 15 फेब्रुवारीनंतर होणार मोठी वाढ

राज्यात मागील काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात जाणवणारी थंडी आता संपली असून नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. 15 फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रातील तापमानात वाढ होते. तर मुंबईतही थंडी ओसरली असून दुपारी तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मुंबईत कालच्या तुलनेत तापमानात 7.6 अंशांनी वाढ झाली आहे. यामुळे सकाळ आल्हादायक असली तरी दुपारी मात्र तीव्र उष्णता सहन करावी लागतेय.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून तापमान वाढत असून कमाल तापमान 36 अंशांवर गेले आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले तर कुलाब्यात तापमान 23.5 अंश सेल्सिअसवर नोंद झाले आहेत. रविवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 16.6 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. तापमान वाढीमुळे उष्णतेतही मोठी वाढ झाली आहे.

यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही किमान तापमानात मोठी घट झाली आहे. उद्या ( 14 फेब्रुवारी) देखील दोन्ही भागातील किमान तापमान कमी राहणार आहे. मात्र 15 फेब्रुवारीनंतर तापमान वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याच औरंगाबादमध्ये तापमान 10.2 अंश सेल्सिअस, पुणे 10.6, महाबळेश्वर 13.4, बारामती 12.8, नाशिक 10.9, आणि जळगावात 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना भर दुपारी तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मुंबईत काल कमाल तापमान 36 अंशावर पोहचले आहेत. यामुळे दुपारी उन्हात बाहेर फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

बदलत्या वातावरणाचा शेतीवर परिणाम

राज्यातील सतत बदलणाऱ्या वातावरणाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. यात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. तसेच गहू, हरभरा, मका पिकांनाही बदलत्या तापमानाचा फटका सहन करावा लागत असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकणातील आंबा, काजू बागांवरही या वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे.

उन्हापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल?

हिवाळा संपताच नागरिकांना आता तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मात्र काळजीचे कारण नसून नागरिकांनी योग्यची खबरदारी घ्यावी. उन्हात घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली बाळगावी. तसेच व्हाईट किंवा कोणत्याही लाईट रंगाचा स्कार्फ वापरावा. चेहरा शक्य असल्यास थंड पाण्याने थुवावा यामुळे उकाड्यापासून थोडा आराम मिळेल. तसेच जास्तीत जास्त पाणी प्या, यामुळे शरीर आतून हायड्रेट राहते. उन्हाळ्यात लिंबू पाणी, ज्यूस, सरबत प्या. लहान मुलांसह सर्वांनी कॉटनचे कपडे घालावे, कारण कॉटनचे कपडे घाम लगेच शोषून घेतात. हे कपडे शक्यतो लाईट रंगाचे, आणि थोडे लूज असावे. अंगाला चकटून राहणारे कपडे वापरणे शक्यतो टाळा.


गडचिरोलीमधील सरकारी घोषणा ठरल्या फोल; अंबादास दानवेंनी काढले वाभाडे

First Published on: February 13, 2023 3:25 PM
Exit mobile version