खुर्ची डळमळीत होताच औरंगाबादचे नामांतर

खुर्ची डळमळीत होताच औरंगाबादचे नामांतर

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची डळमळीत होताच आणि ठाकरे सरकार पडण्याची चिन्हे दिसताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले. हा निर्णय छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेमापोटी घेण्यात आलेला नाही, अशी घणाघाती टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी औरंगाबादच्या नामांतराविरोधात मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात जलील यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

इम्तियाज जलील म्हणाले, बाळासाहेबांनी ३० वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. ज्या मुद्यावर ३० वर्षे दुकान चालवले, त्याविषयी शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला. नामांतराचा निर्णय घ्यायचाच होता तर आधीच घ्यायचा होता. औरंगाबद शहरावर तुमचे इतकेच प्रेम आहे, तर आधी या शहराचा विकास करायला हवा होता. येथील बेरोजगारीचे प्रश्न सोडवून हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे करायचे होते. मग नामांतर करा यचे होते, असे जलील म्हणाले.

हा निर्णय उद्धव ठाकरेंनी मुंबईत बसून घेतला आहे. त्यांचा हा निर्णय आम्ही का स्वीकारायचा? महाविकास आघाडी सरकारची सगळी सूत्रे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हाती होती, पण शरद पवार आता हा निर्णय झाल्यावर त्याची माहिती मिळाल्याचे खोटे बोलत आहेत, असा आरोपही जलील यांनी यावेळी केला.

इम्तियाज जलील काही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्या मोर्चाला जास्त महत्त्व देत नाही. मुस्लीम मते राष्ट्रवादीकडे जाऊ नयेत म्हणून त्यांनी हा मोर्चा काढला आहे.
-अंबादास दानवे, आमदार, शिवसेना

First Published on: July 13, 2022 5:40 AM
Exit mobile version