जगदाळे करणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

जगदाळे करणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

हणमंत जगदाळे

प्रभागाच्या विकासासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी पक्ष सोडत असल्याचे शुक्रवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब केले. तसेच येत्या १२ फेब्रुवारीला आपल्यासह राष्ट्रवादीचे आणखी तीन माजी नगरसेवक व माजी दिवंगत नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण आदी बाळासाहेनांची शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहोत. पक्ष सोडताना आपल्याला कोणाबद्दलही तक्रार नाही. लोकमान्यचे क्लस्टर ही ऑफर देण्यात आल्यानेच हा प्रवेश करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीचे चार माजी नगरसेवकांमध्ये हणमंत जगदाळे, सुधाबाई जाधवर, दिंगबर ठाकुर, वनिता घोंगरे यांच्यासह परिवहनचे माजी सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, माजी नगरसेवक संभाजी पंडीत, युवा पदाधिकारी प्रशांत जाधवर, संदीप घोगरे आदींसह इतर पदाधिकारी रविवारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. लोकमान्य नगर लक्ष्मीपार्क येथे सांयकाळी 6 वाजता हा प्रवेश सोहळा पार पडणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: हजर राहणार असल्याचेही यावेळी जगदाळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान मागील दोन महिन्यापूर्वी सुलेखा चव्हाण यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश निश्चित झाला होता. परंतु प्रवेशाच्या काही क्षण आधी हा प्रवेश लांबणीवर गेला. मात्र आता सुलेखा चव्हाण यांचा देखील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात याच दिवशी प्रवेश होणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.
” लोकमान्य नगरचा विकास व्हावा या उद्देशाने मागील दोन वर्षापासून काय करायचे यावर चर्चा सुरु होत्या. परंतु या भागाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी दुसरा पर्याय नसल्यानेच अखेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहोत. तर पक्ष सोडण्यामागे कोणाचाही दबाव किंवा कोणालाही दोष देणार नाही.”- हणमंत जगदाळे, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे.

First Published on: February 10, 2023 10:50 PM
Exit mobile version