‘मराठवाड्यात प्रत्येक घराला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्याचे काम सुरू’

‘मराठवाड्यात प्रत्येक घराला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्याचे काम सुरू’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाडा दुष्काळमुक्त करतानाच येथील प्रत्येक गावातील आणि शहरातील घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी देण्याची योजना भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने सुरू केली असून औरंगाबाद व जालना जिल्ह्यांचे त्यासाठीचे काम तीन महिन्यातच सुरू होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री येथे सांगितले.
महाजनादेश यात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि किरीट सोमय्या, यात्राप्रमुख व भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव व नगराध्यक्ष सुहास सिरसाट उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाड्यात गेल्या पाचपैकी चार वर्षे दुष्काळाची होती. यंदाही काही भाग वगळता पाऊस योग्य प्रमाणात झालेला नाही. मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असा आमचा निर्धार आहे. त्यासाठी कोकणात समुद्रात वाहून जाणारे नद्यांचे पाणी मराठवाड्यात गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणणार आहे. त्यासाठीचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी २५ टीएमसीचा सविस्तर अहवालही तयार केला आहे. त्यासोबत मराठवाड्यात प्रत्येक गावात आणि शहरात नळाद्वारे शुद्ध पाणी द्यायचे आहे. त्यासाठी ६४ हजार किमीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या घरात शुद्ध पाणी पोहचविण्याच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. औरंगाबाद जालना जिल्ह्यासाठीचे ४ हजार कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध झाले असून पुढच्या तीन महिन्यात काम सुरू होईल.

दरम्यान, पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्याची मागणी चाळीस वर्षे जुनी आहे. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारची ते करण्याची हिंमत नव्हती. या कामासाठी खूप पैसे लागतील, असे अधिकारी सांगत होते. पण आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे. या कामासाठी लागेल तेवढा निधी देऊ आणि योजना पूर्ण करू. हे पाणी आल्यावर संपूर्ण मराठवाडा दुष्काळमुक्त झालेला असेल.

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतरही विरोधी पक्ष आत्मचिंतन करायला तयार नाहीत. त्यांना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन-ईव्हीएमने हरवले असे सांगतात. जनतेला विश्वास वाटतो की, मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारच देशात आणि राज्यात समस्या सोडवू शकते. त्यामुळे जनतेसाठी ईव्हीएमचा नवा अर्थ आहे की, ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मोदी. हे जनतेच्या मनात ठसल्यामुळे म्हणून जनता मतदान केंद्रात गेल्यावर तेथे गेल्यावर कमळाचे बटण दाबते. या निवडणुकीत ईव्हीएममध्ये मतदान केले तर छोटी मतपत्रिका होती त्यामध्ये मत कोणाला दिले ते दिसायचे. मतदानाच्या शेवटी या कागदी मतांची पडताळणी केली तर देशातील ५४२ मतदारसंघात एकातही फरक दिसला नाही. घोटाळा ईव्हीएममध्ये नाही तर विरोधकांच्या डोक्यात बिघाड आहे, म्हणून जनतेने त्यांना घरी बसवले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच स्थिती असेल आणि विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेता होण्याएवढ्याही जागा मिळणार नाही.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की,

भारतीय जनता पार्टीचे सरकार हेच गरीबांचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच खरे गरीबांचे वाली आहेत. त्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला आहे. २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर द्यायचे आहे. आतापर्यंत देशात अडीच कोटी घरे दिली आहेत व त्यामध्ये वीज कनेक्शन, शौचालय आणि गॅस कनेक्शन आहे. काँग्रेसने १९७२ साली गरिबी हटावची घोषणा दिली पण गरिबी हटवली नाही. आता गरीबांनीच काँग्रेसला हटवले.

First Published on: August 28, 2019 6:37 PM
Exit mobile version