मुरुडमध्ये भात लावणीला सुरुवात

मुरुडमध्ये भात लावणीला सुरुवात

MURUD

गेल्या काही दिवसांपासून पावसाने सातत्य राखल्याने शहर परिसरासह भात लावणीला प्रारंभ झाला आहे. तालुक्यात ३९०० हेक्टर क्षेत्रात 90 टक्के भात पिकाची लागवड केली जाते. सुर्वणा, रूपाली, कर्जत-२ व ५, ८ चिंटू साई, जया, तांबामैसुरी या जातीच्या भाताची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

भातशेतीला अनुकूल पाऊस झाल्याने अवघ्या पंचवीस दिवसांतच पेरणी करण्यात आलेली भाताची रोपे योग्य प्रकारे वाढल्याने लावणीची सुरूवात करण्यात आली आहे. बर्‍याच वर्षांनंतर समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीच्या मशागतीला लागले असून, रोपे तयार झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतातून लावणीला प्रारंभ झाला आहे.

शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाला असला तरी पूर्वजांनी ठेवलेल्या शेतीतून भातरूपी मोती पिकविण्यासाठी शेतकरी आटापिटा करीत असतो. नांगराची जागा आता बहुतेक ठिकाणी पॉवर टिलर यंत्राने घेतली आहे. मजुरीचे दरही परवडनासे झाले आहेत. मात्र यावर मात करीत शेतकरी आपल्या ‘काळ्या आई’ची सेवारूपी मशागत आजही इमाने-इतबारे करीत आहे.

First Published on: July 13, 2019 4:53 AM
Exit mobile version