पावसाळी गटार योजनेचा पुन्हा फज्जा; नाशिकमध्ये सायंकाळनंतर संतत धारेने रस्त्यांचे झाले तलाव

पावसाळी गटार योजनेचा पुन्हा फज्जा; नाशिकमध्ये सायंकाळनंतर संतत धारेने रस्त्यांचे झाले तलाव

शहरात पावसाची जोरदार सलामी

 

नाशिक : मृगाच्या पावसाने नाशिक शहराला सलग दुसर्‍या दिवशी झोडपून काढले आहे. सलग दुसर्‍या दिवशी पावसाळी गटार योजनेचा फज्जा उडून शहरात ठिकठिकाणी पाणी साचून तळे साचली होती. तसेच या गोदावरी काठच्या गटारींच्या चेंबरमधून गटारींचे पाणी थेट गोदोपात्रात मिसळत होते. दरम्यान सायंकाळी चारनंतर रात्री साडेआठपर्यंत २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक शहर व परिसरात शुक्रवारी (दि.१३) मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर शनिवारी (दि.१४) सायंकाळी पावसाचे आगमन झाले. शहरात सायंकाळी साडेपाचला सुरू झालेला संततधार पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. सलग चाललेल्या या पावसामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून पाणी वाहून सखल भागांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी साचून तळ्यांचे स्वरूप आले होते. महापालिकेच्या भूयारी गटार योजनेचे चेंबरची देखभाल व्यवस्थित झालेली नसल्याने या पाण्याचा निचरा होत नसल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. तसेच या सर्व भूमिगत गटारी गोदावरीच्या कडेने पुढे नेलेल्या आहेत. मात्र, या गटारींची क्षमता व पाण्याचा प्रवाह यांचे ताळमेळ बसत नसल्याने गटारींचे चेंबर उघडून त्यातून मोठ्या प्रमाणावर गटारीचे पाणी गोदावरीत मिसळत होते. यामुळे निरीच्या नियमांचा भंग होत असल्याने सलग दुसर्‍या दिवशी महापालिकेच्या पावसाळी भूमिगत गटार योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. शहरातील सर्व चौकांमध्ये तळे साचल्याने दुचाकीवरून जाणार्‍या नागरिकांचे मोठ्याप्रमाणावर हाल झाले.

इंदिरानंगरला घरांमध्ये पाणी
नाशिक शहरात सायंकाळी साडेपाचनंतर सलगपणे कोसळणार्‍या पावसामुळे इंदिरानगर परिसरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे रहिवाशांचे मोठे हाल झाले. काही ठिकाणी रस्त्यांची कामे करताना त्यांची उंची पूर्वीपेक्षा वाढली आहे. यामुळे रस्त्याच्या कडेची घरे खाली गेली असून रस्त्यावरील पाणी थेट घरांमध्ये शिरत आहे. त्याचप्रमाणे नाशिकरोड पोलीस ठाण्यातही पाणी शिरले आहे.

First Published on: June 13, 2020 8:54 PM
Exit mobile version