शेवटी रिझल्ट महत्त्वाचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

शेवटी रिझल्ट महत्त्वाचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

पुणे – एमपीएससीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाचे श्रेय आम्हाला घ्यायचे नाही. आम्ही लोकांना सामोरे जाणारे लोक आहोत. एमपीएससीवर प्रतिक्रिया देताना चुकून मी निवडणूक आयोग असे म्हणालो, त्यावरून विरोधकांनी माझी खिल्ली उडवली, परंतु याप्रश्नी तोडगा काढण्याचा दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला. आयोग कोणताही असू दे शेवटी रिझल्ट महत्त्वाचा. रिझल्ट देण्याचे काम मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकाकारांना उत्तर दिले. शुक्रवारी पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कसबा मतदारसंघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी थेट मुख्यमंत्री मैदानात उतरले होते. येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोड शोनंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

प्रचार रॅलीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, खरेतर कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. कारण अंधेरीची पोटनिवडणूक जेव्हा झाली तेव्हा राज ठाकरे यांनी विनंती केली, शरद पवार यांनी आम्हाला विनंती केली. त्यावेळी आम्ही माघार घेतली, मात्र या पोटनिवडणुकीत तसे झाले नाही. खालच्या पातळीवरचा प्रचार सुरू झाला आहे. शेतकरी पाणी मागतो तेव्हा हे धरण दाखवतात. त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार? आम्ही काहीही चुकीचे बोलत नाही. चुकीच्या ठिकाणी जात नाही. कृष्णा काठावर प्रायश्चित्त घेण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही, येणार नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला.

अनेक वर्षांपासून कसबा म्हटले की भाजपचा आमदार निवडून येतो. मुक्ता टिळक यांच्या घरी गेलो होतो तेव्हा आजारी असतानाही त्यांनी इथल्या भागाचे प्रश्न माझ्याकडे मांडले होते. निष्ठा काय असते ते मुक्ता टिळक यांनी दाखवून दिले होते. गिरीश बापट यांनाही आम्ही प्रचारात येऊ नका, असे सांगितले होते, तरीही ते आलेच, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक प्रकारच्या पोटनिवडणुका झाल्या, पण राज्याचे मुख्यमंत्री रोड शोच्या निमित्ताने फिरलेले महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले. आजही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुण्यात ठाण मांडून आहेत. पोटनिवडणुकीकडे लक्ष देऊन आहेत. यावरूनही त्यांच्यासाठी ही पोटनिवडणूक किती प्रतिष्ठेची झाली आहे हे कळते.
-अजित पवार, आमदार, राष्ट्रवादी

 

First Published on: February 25, 2023 5:26 AM
Exit mobile version