‘समृद्धी’ टोलनाका तोडफोड प्रकरणी पोलिसांनी आवळला फास, ८ जण ताब्यात

‘समृद्धी’ टोलनाका तोडफोड प्रकरणी पोलिसांनी आवळला फास, ८ जण ताब्यात

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवून त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ काही मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील सिन्नर जवळील गोंदे टोलनाक्याची तोडफोड करत  खळखट्याक केले होते. या सर्व तोडफोडीत मनसेचे नाशिक मधील कार्यकर्ते सहभागी असल्याची बाब समोर आली होती. रविवारी (दि. २३) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला होता. दरम्यान, ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी  घटनास्थळी भेट देत कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर फास आवळायला सुरवात केली आहे.

 मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा अडवला म्हणून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. वावी पोलीस ठाण्यात तोडफोड केल्या प्रकरणी १० ते १५ अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी रात्री बारा वाजेच्या सुमारास ८ जणांना अटक केली आहे.

स्वप्निल संजय पाटोळे (वय 28 वर्षे, अभियंता नगर, नवीन नाशिक), ललित नरेश वाघ (वय 28 वर्षे, पवन नगर, सिडको), शुभम सिद्धार्थ थोरात (वय 27,दत्त चौक, सिडको) मेघराज शाम नवले (वय 29, पाथर्डी फाटा, नवीन नाशिक), शशिकांत शालिग्राम चौधरी (वय 35 वर्षे, जेलरोड, नाशिकरोड), बाजीराव बाळासाहेब मते (वय 34 वर्षे, देवळाली गाव, नाशिक रोड), प्रतीक माधव राजगुरू (वय 23 वर्षे, सावता नगर, सिडको), शैलेश नारायण शेलार (वय 31 वर्षे, खेरवाडी, निफाड) या आठ जणांना वावी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच इतर संशयितांचा शोध पोलीस घेत असून अधिक तपास वावी पोलीस करीत आहेत.

काय घडले होते ?

समृद्धी महामार्गावर रात्री 9.21 वाजता गोंदे फाट्यावरील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांच्या गाडीचा फास्टॅग हा ब्लॅकलिस्ट असल्याचे दाखवण्यात आले होते. पण गाडीमध्ये अमित ठाकरे आहेत हे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले नाही. पण जसे त्यांच्या लक्षात आले त्यांनी त्यांच्या ताफ्याला सूट देऊन ताफा सोडला. मात्र रात्री अडीच वाजेच्या सुमारास संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली.

First Published on: July 24, 2023 8:34 PM
Exit mobile version