आम्ही भाजप नेत्यांना चंपा, टरबुज्या म्हणणार नाही, नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटील यांना टोला

आम्ही भाजप नेत्यांना चंपा, टरबुज्या म्हणणार नाही, नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटील यांना टोला

चंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्याला काँग्रेस गांभीर्याने घेत नाही, नाना पटोलेंचा घणाघात

राज्यात सत्ता गेल्यापासून पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी केंद्राच्या मदतीनं महाराष्ट्रातील राज्य सरकारला अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला आहे. यामुळे भाजप नेते सैरभैर झाले असून त्यांचा तोल ढासळत चालला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेत्यांना आणि मला काहीही म्हटलं तरी आम्ही मात्र भाजप नेत्यांना चंपा आणि टरबुज्या म्हणणार नाही असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांना तेलकट थापा मारुन ओबीसी आरक्षणावरुन समाजाच्या फसवणूकीचे पाप लपवता येणार नाही अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना मराहाष्ट्रातील पप्पू म्हणून संबोधले आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही. तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणूकीचे पाप झाकता येणार नाही. असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.

दरम्यान नाना पटोले यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, आम्ही त्यांना कधीच त्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणत नाही. टिंगल करुन कधीही मोठं होता येत नाही. आमची टिंगल करायला लागले आहेत परंतु पप्पु कोणाला बनवयाचं ते लोकं बनवणारआ आहेत. ह्यांच्या म्हणण्यामुळे कोण पप्पु होणार नाही. भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर जागतिक पप्पु म्हटलं जातं. कोरोनाच्या परिस्थितीवरही केंद्र सरकार अपयशी ठरलं असल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करा

देशातील गरीब, कष्टकरी जनता आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही सतत आवाज उठवत राहणार आहोत. आतापर्यंत ईडी, सीबीआयचा वापर करुन पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह आमचा आवाज बंद करु शकले नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी केवळ पोपटपंची करण्यापेक्षा केंद्र सरकारने अडवून ठेवलेले मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे मुद्दे मार्गी लावून आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करा अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

First Published on: July 11, 2021 3:21 PM
Exit mobile version