सोलापूरमध्ये आयकर विभागाची छापेमारी; 50 कोटींपर्यंतचे गैरव्यवहार उघडकीस

सोलापूरमध्ये आयकर विभागाची छापेमारी;  50 कोटींपर्यंतचे गैरव्यवहार उघडकीस

सोलापूरमधील काही व्यावसासिकांच्या मालमत्तेवर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सोलापूरमधील बीफ कंपनी, बांधकाम व्यावसायिक, भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाकडून गेल्या तीन दिवसांपासून ही छापेमारी सुरु आहे. या छापेमारीमुळे सोलापूर शहरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोलापूरमधील आसरा चौक, कुमठा नाका आणि हैदराबाद रोड परिसरामध्ये आयकर अधिकाऱ्यांनी हे धाडसत्र सुरु केले आहे. यात जवळपास 50 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्याचा संशयातून चौकशी सुरु आहे, सोमवार ते गुरुवार या कालावधीत आयकर विभागाचे हे धाडसत्र सुरु होते. या भंगार विक्रेते आयकराच्या रडारवर असल्याचे दिसतेय.

भंगार विक्रेत्यांनी रोखीने केलेल्या व्यवहारात आणि कागदोपत्री व्यवहारात सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आढळून आल्याने ही कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येतेय. यात भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचेही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. याचसंदर्भात आता आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करत आहेत.

यापूर्वी सोलापूरमधील मुळगाव रोडवरील एका कत्तलखाना चालवणाऱ्या कंपनीवरही आयकर विभागाने छापेमारी केली होती. यावेळी कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे सोलापूरमधील अनेक कंपन्या आता आयकर विभागाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

सोलापूरसह मुंबई, कोल्हापूरमध्येही विविध कंपन्यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. मात्र सोलापूरात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धाडसत्रामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

यासह जालन्यातही आयकर विभागाने शेकडो कोटींची संपत्ती जप्त केली होती. यानंतर महाराष्ट्रातील विविध शहरात एकाच वेळी 24 ठिकाणी छापेमारी केली. यातील सर्वाधिक छापेमारी कारखानदार अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर झाली होती.


देशातील 71 हजार तरुणांना आज मिळणार मोठं गिफ्ट; PM मोदी रोजगार मेळाव्यातून देणार नियुक्तीपत्र

First Published on: January 20, 2023 11:21 AM
Exit mobile version