महाराष्ट्रामध्ये महिन्याभरात स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ, कंपन्यांमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर?

महाराष्ट्रामध्ये महिन्याभरात स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ, कंपन्यांमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर?

महाराष्ट्रात दिवसागणिक स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या महिन्यात स्फोटांच्या एकूण चार भीषण घटना घडल्या आहेत. कोरोना काळानंतर अर्थचक्र पूर्वपदावर येत असताना अशा घटनांत निष्पाप कामगार आणि कर्मचाऱ्यांचे बळी जात आहेत. कंपन्यांमधील यंत्रसामग्रीचे मूल्यांकन करण्याची गरज असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आज पालघर येथील बोईसर-तारापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सायंकाळच्या दरम्यान घडली. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर ६ पेक्षा जास्त कामगार हे जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. या केमिकल कंपनीत उत्पादन सुरू असताना हा स्फोट झाला आहे. बॉयलरचे तापमान दबाव क्षमतेपेक्षा अधिक वाढल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक शक्यता कंपनी व्यवस्थापनाकडून वर्तवली गेली आहे.

काही दिवसांपूर्वी अलिबागमधील आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट झाला होता. यामध्ये ३ ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले होते. केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या आरसीएफ कंपनीत गॅस टर्बाइन युनिटच्या रेफ्रिजरेशन स्टीम प्लांटमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये अनेकजण जखमी झाले होते. या प्लांटमध्ये एसी बदलण्याचे काम करत असताना अचानक स्फोट झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात ९ ऑक्टोबर रोजी भीषण स्फोट झाला होता. यावेळी उरणमधील बोकाडवीरा येथील वायू विद्युत निर्मिती केंद्रात बॉयलरच्या पंपाचा भीषण स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत एका कनिष्ठ अभियंत्यासह दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु या घटनेत एका कनिष्ठ अभियंत्याचा मृत्यू झाला होता.

वसईतील कॉस पॉवर कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली होती. या घटनेत ३ कामगारांचा मृत्यू, तर ७ जण जखमी झाले होते. ही घटना दुपारच्या सुमारास घडली होती. अचानक झालेल्या या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, दिवाळीच्या सणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे देखील आगींच्या घटनेत वाढ होत आहेत. परंतु कंपनीत होत असलेल्या स्फोटांच्या घटनांमुळे कंपन्यांमधील यंत्रसामग्रीचे मूल्यांकन करण्याची गरज आहे का?, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.


हेही वाचा : तारापूरच्या भगेरीया इंडस्ट्रीज कंपनीत भीषण स्फोट, २ कामगारांचा मृत्यू


 

First Published on: October 26, 2022 8:30 PM
Exit mobile version