फसव्या कॉल्समध्ये भारत टॉपवर

फसव्या कॉल्समध्ये भारत टॉपवर

 नाशिक : भारतात कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली असली तरी, आता भारतात वर्षभरात फसव्या कॉलमध्येदेखील प्रचंड वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा कॉल्सच्या बाबतीत भारत जगभरात चौथ्या क्रमांकांवर आला आहे. भारतात वर्षभरात फसव्या कॉल्सची संख्या १.४ टक्क्यांवर पोहोचली असून, दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. ओटीपी, केवायसी अपडेट, ऑनलाईन विक्री आणि लॉटरीचे आमिष दाखवून देशभरातील ग्राहकांना लाखो रुपयांना लुटण्यात आल्याचे यातून समोर आले आहे.

ट्रू-कॉलरने २०२१ च्या वार्षिक ग्लोबल स्पॅम रिपोर्टची पाचव्या आवृतीचे प्रकाशन केले. त्यात वर्षभरात भारतात विक्री आणि टेलिमार्केटिंग कॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे म्हटले आहे. सायबर क्राईममध्येदेखील यामुळे वाढ झाली आहे. देशभरातील मोबाईलधारक ग्राहकांना स्पॅम व स्कॅम्स कॉल्समार्फत वेगवेगळी आमिष दाखवत लुटण्यात आले आहे. स्पॅम म्हणजे जाहिरातीचे कॉल्स आणि स्कॅम्स म्हणजे फसवणूक करणारे कॉल्स ग्राहकांवर कशाप्रकारे प्रभाव टाकतात, याची माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. ट्रू-कॉलरला जगभरात ३०० दशलक्षपेक्षा अधिक वापरकर्त्यांना आलेले अनोळखी ३७.८ अब्ज स्पॅम कॉल्स ओळखणे शक्य झाले आहे.

रिपोर्टनुसार भारत कॉल्सबाबत भारत नवव्या स्थानावरुन थेट चौथ्या स्थानावर पोहोचल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. २०२१ मध्ये सर्वाधिक स्पॅम कॉल्स जाहिरातीशी संबंधित २०२ दशलक्ष ग्राहकांना आलेले आहेत. दररोज ६ लाख ६४ हजार कॉल्स आणि दर दिवसाच्या प्रत्येक तासाचे २७ हजार कॉल्स जाहिरात व फसवणुकीशी संबंधित आहेत.

फसव्या कॉल्सपासून सावध राहिले पाहिजे. फसव्या कॉल्समध्ये वेगवेगळे आमिष व भिती दाखवत बँक खात्याची माहिती गोपनीय माहिती विचारली जाते. ही माहिती मिळताच लाखो रुपये गायब केले जातात. त्यामुळे गोपनीय माहिती कुणालाही देवू नये व मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधावा.
– सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

वर्षभरात कोरोनामुळे लॉकडाऊन आणि आधुनिक पर्याय डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे असली सायबर क्राईममध्येही वाढ झाली आहे. मात्र, ट्रू-कॉलरचा योग्य वापर केला तर सायबर क्राईमपासून वाचू शकतो. फसव्या कॉल्स व एसएमएसपासून सावध राहावे. अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या कॉल्सला नागरिकांनी कोणतीही माहिती देवू नये.
तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

First Published on: December 27, 2021 8:15 AM
Exit mobile version