अंबड लिंकरोडवर वर्चस्ववादातून बेछूट गोळीबार

अंबड लिंकरोडवर वर्चस्ववादातून बेछूट गोळीबार

नाशिक : शहरात गोळीबार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अंबड लिंकरोडवरील संजीवनगरात किरकोळ वादातून बुधवारी (दि.९) रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान ही गोळीबारची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र तत्पूर्वी गोळीबार करणारे संशयित फरार झाले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, व्यावसायिक वर्चस्वातून दोन्ही बाजूकडून हा गोळीबार झाल्याची बाब समोर येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजीवनगर येथील भंगार माल खरेदी-विक्री व्यवहारातून परप्रांतीय व्यावसायिक व कामगारांच्या दाेन गटात वर्चस्वाच्या वादातून बाचाबाची हाेऊन एका गटातील दोघांनी विदेशी बनावटीच्या पिस्तूलमधून तीन गोळ्या हवेत तर दोन गोळ्या समोरच्या दिशेने झाडल्याची चर्चा परिसरात पसरली. तर काही प्रत्यक्षदर्शीच्या मते किमान ९ ते १० गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. हा संपूर्ण वाद व्यवसायातील वर्चस्ववादातून घडल्याचीही माहिती समोर येत आहे. अंबड लिंकरोड परिसरात गुन्हेगारी तसेच अवैध व्यवसायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील अनेक दिवसापासून याभागात स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे. तसेच, सद्यस्थितीत सुरू असलेल्या अवैध व्यवसाय, गुन्हेगार यांच्यावर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

First Published on: November 10, 2022 1:58 PM
Exit mobile version