बाउन्सरच्या गराड्यात इंदुरीकर महाराज; कीर्तनाच्या व्हिडिओवर बंदी

बाउन्सरच्या गराड्यात इंदुरीकर महाराज; कीर्तनाच्या व्हिडिओवर बंदी

इंदुरीकर महाराज आणि बाउंसर

कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. एकाबाजुला पुत्रप्राप्तीचे विधान केल्याबद्दल आरोग्य विभागाची नोटीस, महिला वर्गाची नाराजी आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा रोष ओढवून घेतला असताना दुसऱ्या बाजुला इंदुरीकर महाराजांचे समर्थकही मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये झालेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात महाराजांनी चक्क बाउन्सरची मदत घेतली. या बाउन्सरच्या बंदोबस्तातच ते कीर्तनाच्या ठिकाणी आले. यावेळी त्यांच्या कीर्तनाचे रेकॉर्डिंग करण्यास बंदी घालण्यात आली होती.

शनिवारी नगरमधील भिंगार येथे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षेसाठी नेमलेल्या बाउन्सरच्या बंदोबस्तातच त्यांनी कीर्तन केले. इंदुरीकर महाराजांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर या किर्तनासाठी मोठी गर्दी जमली होती. इंदुरीकर यांच्या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटत असून नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी यासंदर्भात त्यांना बजावलेली नोटीस देखील त्यांना मिळाली आहे. त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत असतानाच काही संघटनांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे नगरमध्ये त्यांचे कीर्तन होणार की नाही याबाबत साशंकता होती. शनिवारी बाउंन्सरच्या बंदोबस्तातच ते भिंगारमधील शुकलेश्वर मंदिरामध्ये कीर्तनासाठी आले. यावेळी कोणीही त्यांच्या कीर्तनाचे शूटिंग करू नये, अशा स्पष्ट सूचना आयोजकांनी दिल्यानंतरच त्यांनी आपले कीर्तन सुरू केले होते.

बीडच्या कीर्तनाचा व्हिडिओ व्हायरल

आरोग्य विभागाने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवल्यानंतर त्यांचे बीडमधील परळी तालुक्यात कीर्तन झाले होते. या कीर्तनात त्यांनी आपण काहीही चुकीचे सांगितले नसल्याचा दावा केला. तसेच आपण जे बोललो ते धर्मग्रथांत लिहिले असेही त्यांनी सांगितले. तर आपल्याला संपवण्यासाठी युट्यूबचा वापर होत असल्याचा आरोप इंदुरीकर महाराज यांनी केला.

 

First Published on: February 15, 2020 4:10 PM
Exit mobile version