अल्पवयीन मुलांना लॉजची माहिती मग त्र्यंबक पोलिसांना का नाही?

अल्पवयीन मुलांना लॉजची माहिती  मग त्र्यंबक पोलिसांना का नाही?

त्र्यंबक रोडवरील अनेक लॉज शाळकरी मुलामुलींना सहजरित्या उपलब्ध होत आहेत. मुले या लॉजिंगचा वापर अनैतिक बाबींसाठी करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. तरीही, त्र्यंबकेश्वर पोलीस करावाई करताना दिसत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. जे लॉज मुलामुलींना माहिती आहेत ते त्र्यंबकेश्वर पोलीस का माहिती नाही, अर्थपूर्ण हितसंबंधामुळे त्र्यंबकेश्वर पोलीस जाणीवपूर्वक कारवाईकडे दुर्लक्ष करत आहेत का, असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे त्र्यंबकेश्वरच्या धार्मिकतेला गालबोट लागत असल्याचेही बोलले जात आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानाकडे जाणार्‍या रस्त्यात सध्या ३०० लॉजिंग सुरू आहेत. यातील बहुसंख्य लॉजिंग अनधिकृत आहेत. काही लॉजिंगवर अनैतिक व्यवसाय सुरू आहेत. शिवाय, शाळकरी मुलेदेखील या लॉजिंगचा वापर अनैतिक बाबींसाठी करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अत्यल्प दरात अगदी तासाभरासाठीही सहजरित्या लॉजिंग उपलब्ध होत असल्याने अनैतिक संबंधांसाठी अनेक जोडपी या ठिकाणी येतात. परिणामी, मुली आणि महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या लॉजिंगमुळे परिसरातील शाळा, महाविद्यालयातील मुलींनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. लॉजवर अल्पवयीन विद्यार्थ्यांचा वावर वाढल्यामुळे परिसरातील पालकांची चिंता अधिक वाढली आहे. त्र्यंबक रस्त्यावर शाळा-महाविद्यालयांची संख्याही मोठी आहे. या महाविद्यालयांमध्ये देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणाच्या नावाखाली चंगळवाद करत असून, विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळेदेखील लॉजिंग वाढल्याचे बोलले जात आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील काही पोलिसांचे लॉजचालकांशी अर्थपूर्ण हितसंबंध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

First Published on: April 21, 2024 4:36 PM
Exit mobile version