क्वॉरंटाईन रुग्णांच्या हातावर ओळखीसाठी शिक्का; आरोग्यमंत्र्यांची माहिती!

क्वॉरंटाईन रुग्णांच्या हातावर ओळखीसाठी शिक्का; आरोग्यमंत्र्यांची माहिती!

होम क्वारंटाईन केलेला शिक्का

भारतात करोनाचा फैलाव हळूहळू वाढू लागला असून त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३९वर जाऊन पोहोचली आहे. देशभरात सर्वाधित करोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून शक्य त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यामध्ये त्यांनी क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींना, निवडणुकीदरम्यान मतदान करताना ज्या प्रमाणे मतदारांना शाई लावली जाते, त्याप्रमाणे हातावर शाई लावली जाणार असल्याचं सांगितलं आहे. करोनासाठी निगेटिव्ह लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेल्या १० देशांमधून आलेल्या रुग्णांच्या त्यांच्या चाचणीनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

शाई असेल क्वॉरंटाईनची ओळख!

आरोग्य खात्याने करोनासंदर्भातल्या संशयित रुग्णांची अ, ब आणि क अशा तीन प्रकारांमध्ये वर्गवारी केली आहे. त्यानुसार, ‘अ’मध्ये थेट लक्षणं दिसणारे रुग्ण, ‘ब’मध्ये काहीशी वयस्कर लोकं आणि ‘क’ वर्गामध्ये तरूण वयोगटातल्या व्यक्ती असतील. यातल्या ‘क’ वर्गातल्या व्यक्तींची चाचणी करून त्यांचं समुपदेशन करून त्यांना घरीच होम क्वॉरंटाईमध्ये राहण्यास बजावलं जाईल. तसेच, या व्यक्तींची ओळख पटावी, म्हणून त्यांच्या हातावर निवडणुकीदरम्यान ज्या प्रमाणे शाई लावली जाते, तशी शाई लावली जाईल, असं देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ही शाई लावलेल्या व्यक्ती सरकारने सांगितलेल्या कालावधीपर्यंत म्हणजेच ३१ मार्चपर्यंत होम क्वॉरंटाईन असतील.

पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे!

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीविषयी लोकांना माहिती दिली. ‘करोनाचा फैलाव तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात जास्त वेगाने होतो हे दुसऱ्या देशांमधल्या उदाहरणांमधून दिसून आलं आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत’, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे येत्या दोन आठवड्यांमध्ये अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.


हेही वाचा – करोना रोखण्याचे उपाय सुचवा आणि १ लाख जिंका-नरेंद्र मोदी
First Published on: March 16, 2020 9:48 PM
Exit mobile version