आपल्यावरील हल्ल्यांची सीबीआय मार्फत चौकशी करा, किरीट सोमय्या यांची उच्च न्यायालयात याचिका

आपल्यावरील हल्ल्यांची सीबीआय मार्फत चौकशी करा, किरीट सोमय्या यांची उच्च न्यायालयात याचिका

आपल्यावर झालेल्या हल्ल्यांची निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे ( सीबीआय ) सोपविण्यात यावा , अशी मागणी करणारी याचिका भाजपा नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे.

या याचिकेत डॉ. सोमय्या यांनी त्यांच्यावर अलीकडच्या काळात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा व त्या अनुषंगाने पोलिसांच्या वर्तनाचा उल्लेख केला आहे. याचिकेत म्हटले आहे की , खार पोलीस स्थानकात आपल्यावरील झालेल्या हल्ल्याबाबत आपण बांद्रा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल गेलो होतो. माझे म्हणणे नोंदवून घेतल्यावर पोलीस निरीक्षक राजेश शांताराम देवरे यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा बनावट एफआयआर ( क्र. ०५८६ / २०२२ ) दाखल केला.

या एफआयआर विरोधात मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार दाखल केली. या बाबत आपण राज्यपालांकडेही तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांकडून आपल्यावरील हल्ल्यांची चौकशी योग्य पद्धतीने होण्याची खात्री नसल्याने हा तपास सीबीआय कडे सोपवावा, असेही डॉ. सोमय्या यांनी याचिकेत नमूद केले आहे.

२३ एप्रिल रोजी राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केल्यानंतर किरीट सोमय्या त्यांना भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, राणा दाम्पत्याची भेट घेऊन परतत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात सोमय्या किरकोळ जखमी झाले होते. शिवसैनिकांनी यावेळी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या.


हेही वाचा : ऐ भोगी !…काहीतरी शिक आमच्या योगींकडून, अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला


 

First Published on: April 28, 2022 7:18 PM
Exit mobile version