प्रेमप्रकरणात जीव घेण्याचे ठराव करणे आता बाकी?; ऑनर किलिंग घटनेमुळे ‘अंनिस’चा सवाल

प्रेमप्रकरणात जीव घेण्याचे ठराव करणे आता बाकी?; ऑनर किलिंग घटनेमुळे ‘अंनिस’चा सवाल

नाशिक : जिल्ह्यातील मुखेड येथील तरुण प्रतिक आहेर याचा प्रेम करतो, या संशयावरून मुलीच्या पालकांकडून नुकताच निर्घृण खून करण्यात आला. याच जिल्ह्यात प्रेम करुन विवाह करणार्‍यांना पालकांची परवानगी घेतल्याशिवाय विवाहाची नोंद न करण्याचा ठराव केला जातो व दुसर्‍या आठवड्यातच मुखेडची घटना घडली. त्यामुळे खापपंचायतसारखे मुलीचे पालक आता प्रेम केले तर जीव घेण्याचा ठराव घेण्याचे सुचवतील, असा उपरोधिक प्रश्न जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केला आहे.

एका बाजूने पालकाच्या परवानगी घ्या म्हणायचे तर दुसर्‍या बाजूने मुलीच्या पालकांनीच जीव घ्यायचा हे निषेधार्य आहे. पालकच जर असा खून करणार असतील तर त्याच्यांमध्येच जनजागृती करण्याची गरज आहे. प्रतिकच्या खूनानंतर या निमित्ताने नाशिक जिल्ह्यात ‘प्रेम व हिंसा’ या विषयावर प्रबोधन मोहीम राबविण्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठरविले आहे. गावोगावी याबाबत प्रबोधन करण्यात येईल, अशी माहिती कृष्णा चांदगुडे यांनी दिली.

प्रतिकच्या खूनाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी चांदगुडे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांच्याकडे केली आहे. गावोगावी असणारे तथाकथित रखवालदारांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. हरियाणातील खापपंचायतच्या वाढत्या (डीस) ऑनर किलिंगच्या घटनांनंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप केला आहे. प्रेमाला विरोध करणार्‍या अपप्रवृत्तींवर पोलीसांनी अंकुश लावला आहे. पोलीस प्रशासनाच्या आवारात असणार्‍या ‘शेल्टर होम’ मध्ये हिंसेच्या विचार करणार्‍या पालकांचे समुपदेशन केले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात अशा अपप्रवृत्तींविरोधात शासनाने भूमिका घ्यावी व पुरोगामीत्वाची परंपरा अधिक उज्वल करण्याची मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

या घटनेनंतर मुखेड ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकीचे कौतुक करण्यात आले. पालकांच्या अशा अपप्रवृत्ती विरोधातच ठराव होण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. निवेदनावर डॉ. टी.आर.गोराणे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, महेंद्र दातरंगे, अ‍ॅड. समीर शिंदे आदींच्या स्वाक्षरी आहे.

अशी घडली ऑनर किलिंगची घटना

प्रेमप्रकरणाच्या संशयातून येवला तालुक्यातील मुखेड येथील प्रतिक आहेर (वय २३) याचा खून करण्यात आला. यामुळे रविवारी (ता. २०) व सोमवारी (ता. २१) गाव बंद पाळून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रतिक आहेरला शनिवारी (ता. १९) दुपारी संशयित संदीप जाधव, निखिल जाधव, सुनील जाधव, वसंत जाधव यांनी शेतात बोलावून घेतले. त्याला संशयितांनी आमच्या मुलीला वाईट नजरेने का बघतो, असा प्रश्न करत मारहाण केली. लाकडी दांड्याने व लोखंडी रॉड डोक्यात टाकल्याने प्रतीक जबर जखमी झाला होता. त्याला नाशिकला उपचारासाठी हलविले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विकास आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण व खूनाचा गुन्हा दाखल झाला. सोमवारी नातेवाईकांनी प्रतिकचा अंत्यसंस्कार संशयिताच्या घराच्या आवारातच करण्याचा हट्ट धरला. पोलीस व काही पदाधिकार्‍यांनी समजूत काढल्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सोहेल शेख, तालुका प्रभारी पोलिस निरीक्षक विशाल क्षीरसागर, सहाय्यक निरीक्षक बहीर यांनी भेट दिली.

First Published on: August 23, 2023 2:53 PM
Exit mobile version