प्रत्येक ठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्याची गरज काय? किशोरी पेडणेकरांचा भाजपला सवाल

प्रत्येक ठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्याची गरज काय? किशोरी पेडणेकरांचा भाजपला सवाल

मुंबई –  दिवाळी पहाट निमित्त ठिकठिकाणी दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून मोठ्या जल्लोषात दिवाळी पहाटचं आयोजन झालं. यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला आहे. प्रत्येक ठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. काही ठिकाणी केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलंय, लोकांमध्ये आणि लोकांसोबत राहणे. वरळी विधानसभेत दिवाळी पहाट सुरू आहे. काही ठिकाणी पैशांचा पाऊस पडतोय. विचार काहीच नाही. जांबोरी मैदान रडतंय, लोकं वैतागली आहेत. आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते. भाजपाची दिवाळी पहाट पहिल्यांदा होतेय. हा विचार, संस्कार आहे. प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी पहाट आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, मोठमोठे अभिनेते आणून लोकांवर छाप पाडायची नसते. लोकांमधील कलागुणांना वाव देणारी आमची पहाट असते. प्रत्येक ठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. काही ठिकाणी केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. लोक विचारांसोबत आहेत. वारेमाप पैसा खर्च करून पाहिजे तसा कार्यक्रम घेऊ शकतात. या देशात, मुंबईत नवीन नवीन पायंडे पाडले जात आहेत, त्याला आपण सगळे बळी पडतोय असंही त्यांनी सांगितले.

तसेच विरोधकांना टीका करावीच लागणार. इतके दाबूनही उद्धव ठाकरे शांत बसत नाहीत. त्यांच्यावर तोंडसुख घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळू शकत नाही. त्यामुळे सगळे ओके आहे. आम्ही सरकारमध्ये असताना टाहो फोडायची गरज काय होती? सवयीप्रमाणे भूमिका बदलणे म्हणजे भाजपा. आनंदाचा शिधा न मिळाल्याने शिमगा झाला. खऱ्या गोष्टींकडे लक्ष न देणे, केवळ हिंदू सण नाही सगळ्यांचे सण साजरे होणार आहे. निव्वळ मुंबई डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे आणि महापालिकेला लक्ष्य केले जात आहे हे लोकांना दिसतंय.

First Published on: October 24, 2022 2:37 PM
Exit mobile version