Yashwant Jadhav IT Raid : स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी ITची धाड, नेमकं काय आहे प्रकरण?

Yashwant Jadhav IT Raid : स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी ITची धाड, नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आज(शुक्रवार) आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मागील ५ वर्षांपासून यशवंत जाधव हे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. परंतु बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली असून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

भाजपचा आरोप

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यशवंत जाधवांनी प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावे १५ कोटींची मनी लाँड्रींग केल्याचा आरोप आयटीच्या तपासणी अहवालात समोर आल्याचा आरोप आहे. जाधवांनी १५ कोटी रूपये दुबईला हलवल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच दुबईत सिनर्जीत व्हेंचर्स सईद डोन शारजा या दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. दोन्ही कंपन्या त्यांच्या कुटुंबियांच्या असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

२०१५ मध्ये ६ हजारांना महापालिका टॅब विक घ्यायची त्याची किंमत २०२२ मध्ये २० हजार रूपये दाखवण्यात आली आहे. महापालिकेत दरवर्षी किमान ६ हजार कोटींचे टेंडर्स पास होतात. २५ वर्षांचा हिशोब लावला तर किमान दीड लाख कोटींची भ्रष्टाचार स्थायी समितीच्या माध्यमातून शिवसेनेना केला आहे, असा आरोप भाजपाने केला होता.

यशवंत जाधव यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी

यशवंत जाधव यांच्या निकटवर्तीयांवर सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. जाधव यांचे निकटवर्तीय आणि माझगाव विभाग संघटक विजय लिपारे यांच्या काळाचौकीच्या घरी सुद्धा आयकर विभागाने धाड टाकली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेतील शिपायाच्या घरीही छापा टाकू शकतात, अशा प्रकारचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर करत भाजपवर टीका केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

२०११-१२ मध्ये उदय महावर नावाच्या व्यक्तीनं प्रधान डिलर्स नावाची कंपनी बनवली होती. त्यानंतर ही कंपनी जाधव कुटुंबाला विकण्यात आली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यामध्ये जवळपास ७.५ कोटी संपत्ती असल्याची माहिती देण्यात आली होती. आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांच्याकडे ४.५९ कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलं होतं. यामध्ये १.७२ कोटींची स्थावर मालमत्ता होती. मात्र, आता जाधवांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली असून त्यांचे निकटवर्तीय आणि त्यांचा मुलगा निखिल जाधवच्या घरी सुद्धा आयकर विभागाने धाड टाकली असून त्यांची चौकशी केली जात आहे.


हेही वाचा : महापालिका निवडणुका असल्याने पालिकेतील शिपायांवरही रेड टाकतील – संजय राऊत


 

First Published on: February 25, 2022 11:55 AM
Exit mobile version