दुर्मीळ नाण्यांद्वारे देशाचा गौरवशाली इतिहास जपणे आवश्यक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे प्रतिपादन

दुर्मीळ नाण्यांद्वारे देशाचा गौरवशाली इतिहास जपणे आवश्यक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे प्रतिपादन

मुंबई : भारताचा इतिहास अतिशय जाज्वल्य आणि वैभवशाली आहे. प्रत्येक कालखंडात आपण परकीय आक्रमकांना धैर्याने लढा दिला आहे. इतिहासाच्या विविध कालखंडांमध्ये वापरली गेलेली नाणी ही त्या इतिहासाचा पुरावा आहे. त्यामुळे देशाचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी ही दुर्मीळ नाणी जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

नाणेशास्त्र विषयातील तज्ज्ञ व लेखक डॉ. दिलीप राजगोरलिखित ‘रिपब्लिक कॉईन्स ऑफ इंडिया’ (भारतीय गणराज्यातील नाणी) या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी राजभवनात झाले. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व नाणे संग्राहक दिनेशभाई मोदी, हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष व नाणे संग्राहक पॉल अब्राहम तसेच नाणेशास्त्रविषयातील अभ्यासक उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, जो इतिहास विसरतो त्याला भविष्य देखील विसरते. जुनी नाणी इतिहासातील महत्त्वपूर्ण नोंदी असल्याचे त्यांनी सांगितले. लेखक डॉ. दिलीप राजगोर यांनी नाण्यांच्या विश्वात मोठे संशोधन करून भारत गणराज्य निर्मितीनंतरच्या नाण्यांची अभ्यासपूर्ण माहिती पुढे आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. गणराज्याची नाणी हे पुस्तक युवकांकरिता प्रेरणास्रोत व अभ्यासकांकरिता मैलाचा दगड सिद्ध होईल, असेही राज्यपालांनी सांगितले.

विविध टांकसाळींमध्ये घडवल्या गेलेल्या नाण्यांनी देशाची एकात्मता बळकट केली गेली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ दिनेशभाई मोदी यांनी केले. नाण्यांमध्ये वापरली गेलेली चिन्हे व डिझाइन्स देशातील विविध धर्मांचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे ही नाणी देशातील विविध धर्म, पंथांच्या लोकांना जोडण्यास सहाय्यक ठरली आहेत, असे त्यांनी सांगितले. डॉ. दिलीप राजगोर हे केवळ नाणेशास्त्रज्ज्ञ नसून त्यांनी ब्राह्मी, प्राकृत व उर्दू भाषेचे देखील अध्ययन केल्यामुळे त्यांचे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले.

जुनी नाणी जमवणे हा केवळ छंद नसून आपला इतिहास जाणून घेण्याचे एक माध्यम असल्याचे नाणेसंग्राहक व हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष पॉल अब्राहम यांनी सांगितले. नाणी जमा करणे सोपे आहे. परंतु, त्याबद्दल ऐतिहासिक पुराव्यांसह लिहिणे कठीण काम आहे. नाणी म्हणजे केवळ चलन नसून त्यात सौंदर्य व इतिहास आहे, असे अब्राहम यांनी सांगितले.
रिपब्लिक कॉईन्स ऑफ इंडिया या पुस्तकात सन 1947 ते 2022 या काळात देशात चलनात आलेल्या सर्व नाण्यांची संदर्भासह अभ्यासपूर्ण माहिती आहे. यापूर्वी ‘सल्तनत कॉईन्स ऑफ इंडिया’ हे पुस्तक देखील प्रकाशित केले असल्याचे डॉ. दिलीप राजगोर यांनी सांगितले. यावेळी राजगोर यांनी राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराजांची ‘शिवराई’ ही नाणी भेट दिली.

First Published on: October 27, 2022 10:01 PM
Exit mobile version