अजित पवारांनी नगरसेवक फोडले असे नाही-संजय राऊत

अजित पवारांनी नगरसेवक फोडले असे नाही-संजय राऊत

मुंबईतील उपायुक्तांच्या रद्द केलेल्या बदल्या, पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे फोडलेले पाच नगरसेवक, त्याचा बदला म्हणून कल्याण, अंबरनाथ पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी केलेली हातमिळवणी अशा महाविकास आघाडीतील धुमशानानंतर सोमवारी ‘मातोश्री’ वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मोठी पळापळ झाली. त्यानंतर मंगळवारी शिवसेनेकडून सारवासारव करण्यात आली आहे. आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही, असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामना कार्यालयात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास व्यक्त केला असून सरकारमध्ये कोणतेही मतभेद, कुरबुरी, अंतर्विरोध नसल्याचे सांगितले आहे.

संजय राऊत म्हणाले की, पारनेरच्या मुद्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा झाली आहे. हा स्थानिक पातळीवरचा विषय होता, तो तिथेच संपायला हवा होता. आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही. त्यामुळे आता हा विषय आता चर्चेत येऊ नये, असे मला वाटते. पारनेर नगरपंचायतीमधील पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ४ जुलै रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला. बारामतीत हा कार्यक्रम पार पडला. यामुळे स्थानिक राजकारणात खळबल उडाली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे.

फडणवीसांवर टीका
देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोध आहे. पण अंतर्विरोध काय, तर आंतरपाटही नाहीये. आम्ही वरमाला घातल्या आहेत, आमच्यात कोणताही आंतरपाट नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे देशातील तीन प्रमुख पक्षांनी बनवलेलं आहे. ही खिचडी नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. काल शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्यांनीही ठाम विश्वास व्यक्त केला आहे की, हे सरकार पाच वर्ष काम करेल, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

आघाडीचे निर्णय वरच्या पातळीवर होतात -रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार यांनी पारनेर नगरसेवक फोडाफोडीवर भाष्य करताना महाविकास आघाडीत सर्व निर्णय हे वरच्या पातळीवर होतात. त्यामुळे चर्चा झाल्याशिवाय कुठला निर्णय होत नाही. राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नगरसेवक अंतर्गत राजकारणाला कंटाळून दुसर्‍या पक्षात जाण्याचा विचार करत होते. याचा दुष्परिणाम महाविकास आघाडीवर होऊ नये, यासाठी त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

First Published on: July 8, 2020 6:54 AM
Exit mobile version