लोणीकरांकडून पालकमंत्री टोपेंविरुद्ध अपमानास्पद भाषा

लोणीकरांकडून पालकमंत्री टोपेंविरुद्ध अपमानास्पद भाषा

आमदार बबनराव लोणीकर

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शिवप्रसाद चांगले यांनी लोणीकर यांच्याविरुद्ध जालनातील अंबड पोलीस ठाण्यात अपमान आणि भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीचे असमान वाटप होत असल्याचा आरोप करत लोणीकर यांनी गुरुवारी जालना येथील कार्यालयात निदर्शने केली होती. परतूर मतदारसंघातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल लोणीकरांनी जिल्हाधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी पालकमंत्री राजेश टोपे हा राज्यपालांच्या पोटचा आहे का? हरामखोर, असा वादग्रस्त उल्लेख जिल्हाधिकार्‍यांशी बोलताना केला.

राजेश टोपे हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी लोणीकर यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. ते म्हणाले की, लोणीकर यांनी राजेश टोपे यांच्या विरोधात बोललेले शब्द चुकीचे आहेत. याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यात त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना थोबाडीत मारण्याची भाषा केली होती. या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

First Published on: November 22, 2021 12:20 AM
Exit mobile version